सोलापूर : प्रेयसीच्या पतीला संपवताना प्रियकराचाही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी कारस्थानी पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूरच्या बार्शी तालुक्यात अनैतिक संबंधातून पतीसोबत पत्नीच्या प्रियकराचाही जीव गेला आहे. प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्यासाठी गेलेल्या प्रियकरासह बुडून दोघांचाही मृत्यू झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. पांगरी पोलिसांनी तपास केल्यानंतर पत्नीनेच प्रियकराला पतीला मारण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. पांगरी पोलीस ठाण्यात मयत प्रियकर आणि पत्नी यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.
advertisement
बार्शी तालुक्यातील महागाव तलावात 18 फेब्रुवारी रोजी दोन व्यक्तींचे मृतदेह आढळून आले होते. तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याबाबतीत पांगरी पोलिस ठाण्यात अज्ञात कारणा विरोधात गुन्हे दाखल झाला होता. त्यानंतर पांगरी पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.
पांगरी परिसरात राहणाऱ्या रूपाली शंकर पटाडे आणि गणेश अनिल सपाटे यांच्यात अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधात पती शंकर पटाडे हा अडथळा ठरत होता. पती शंकर पटाडे यांच्याकडून पत्नी रूपाली पटाडे हिला वारंवार त्रास दिला जात होता. यातूनच पत्नी रूपाली हिने प्रियकर गणेश सपाटी याच्या माध्यमातून पती शंकर पटाडे याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
18 फेब्रुवारी रोजी गणेश सपाटे मित्रांसह दारू आणि जेवणासाठी चल असं म्हणून शंकर पटाडे याला घेऊन गेला. त्यानंतर मध्यरात्री महागाव येथील तलावाच्या पुलावर दोघांनी उतरून डान्स केला. प्रेयसीच्या पतीला पुलावरून खाली तलावात उचलून टाकताना प्रियकर स्वत:ही पाण्यात पडला, त्यामुळे पतीसह प्रियकराचाही बुडून मृत्यू झाला.
प्रियकर आणि पतीला पोहता येत नव्हते, पती बुडत असताना प्रियकराच्या गळ्याला पकडल्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. यातून पत्नीची चौकशी केला असता पतीला मारण्यासाठी मदत केल्याचं समोर आलं. पांगरी पोलिसांनी आता पत्नीला अटक केली आहे.