सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षक विभागात सरासरी ३० टक्के जागा रिक्त असल्याचं कॅगनं म्हटलं आहे. राज्यातील आरोग्य विभागात २७ टक्के डॉक्टर, ३५ टक्के नर्स आणि ३१ टक्के पॅरामेडीकल स्टाफच्या जागा रिक्त आहेत. आरोग्य यंत्रणेतील अनेक जागा रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्था कोमात गेली असून याचा ताण उपलब्ध मॅनपॉवरवर पडत असल्याचं कॅगने म्हटलं आहे. कोरोना काळात आरोग्य व्यवस्थेवर आलेला ताण पाहता सरकारने ११ हजार ३९४ जागांवर भरती करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र केवळ ८ हजार ३३० जागा भरल्या. तब्बल २७ टक्के जागा अजूनही रिक्त आहेत. यातून आरोग्यव्यवस्थेबाबत सरकारची अनास्था लक्षात येते, असंही कॅगने म्हटलं आहे.
advertisement
ट्रॉमा सेंटरची देखील अशीच अवस्था आहे. ट्रॉमा सेंटरच्या सार्वजनिक आरोग्य विभागात २३ टक्के जागा रिक्त आहेत. तर वैद्यकीय शिक्षण विभागात हाच आकडा ४४ टक्के इतका आहे. आयुष कॉलेजची व्यवस्था देखील वेगळी नाहीये. इथे डॉक्टरांच्या २१ टक्के, नर्सेसच्या ५७ टक्के आणि पॅरामेडीकल स्टाफच्या ५५ टक्के जागा रिक्त आहेत. तसेच राज्यातील ३६ संस्थामध्ये आगविरोधी यंत्रणा अस्तित्वात नसल्याचा अहवाल कॅगने विधीमंडळात सादर केला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णालयाची अवस्था तर आणखी बिकट आहे. इथे रुग्णांना उपचारासाठी बराच वेळ रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं. राज्यातील ९३ टक्के रुग्णालयांमध्ये केवळ एकच रजिस्ट्रेशन काऊंटर आहे. भारतीय सार्वजनिक आरोग्याच्या मापदंडानुसार, प्रत्येक रुग्णालयात किमान दोन रजिस्ट्रेशन काऊंटर असणं अपेक्षित आहेत.