दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या अनुषंगाने विविध आरोप प्रत्यारोप सुरू आहे. यादरम्यान नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात याचा संबंध अजित पवार यांच्या अपघातामागे आहे का? याचा तपास करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. तर अजितदादांच्या बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू सापडल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी व्यक्त केला.
advertisement
अजितदादांच्या बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू
शरद पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सुनील माने यांनी एका गंभीर मुद्याकडे लक्ष वेधलं. अजितदादा पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर आणि बारामतीतील बंगल्याबाहेर जादूटोण्यातील वस्तू सापडल्या होत्या. हे कृत्य भोंदू बाबा कॅप्टन खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्ती करत होत्या का? असा प्रश्न मानेंनी उपस्थित केला. तर सत्तेच्या लोभामुळे अजित दादांना न्याय मिळावा यासाठी एकही मंत्री आवाज उठवत नाही, याचा खेद वाटतो, अशी प्रतिक्रिया विकास लवांडे यांनी व्यक्त केली.
अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरातांचा हात?- अमोल मिटकरी
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये कॅप्टन खरात हा व्हीएसआर विमान कंपनीच्या पायलटसोबत तसेच त्याच विमानासमोर उभा आहे. काही दिवसांपूर्वी सहयोग सोसायटी आणि देवगिरी बंगल्यासमोर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा थोतांडावर आमचा किंवा अजितदादांचा विश्वास नव्हता, मात्र हा झालेला प्रयोग अशोक थोरात याच्या सांगण्यावरून झाला का? आणि याचा धागा व्हीएसआर कंपनीपर्यंत जात असेल तर, अजितदादांच्या घातपातामागे कॅप्टन थोरतांचा हात असल्याचा संशय बळावतो. म्हणून अजित दादांच्या विमान अपघात संदर्भात कॅप्टन थोरात याचा कसून तपास झाला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
जलसंपदा विभागाची खरातच्या ट्रस्टला पाणी उचलण्याची परवानगी- विजय कुंभार
देवगिरी बंगलाच नव्हे तर अशोक खरातचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचल्या आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांनी केलाय. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून चाकणकरांना पदावरून हटविण्याची मागणी केल्याचं कुंभार यांनी सांगितलं. जलसंपदा विभागाची खरातच्या ट्रस्टला पाणी उचलण्याची परवानगी दिली, असा दावा विजय कुंभार यांनी केलाय.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची 'छत्री' धोक्यात
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. तंत्रज्योतिषी अशोक खरातवर धरलेली छत्री आणि खरातचे पाय धुतानाचे व्हिडीओ व्हायरल झालेत. त्यातच खरातला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेली आहे. महिलांचं शोषण केल्याचे गंभीर आरोप खरातवर होताहेत. परिणामी रूपाली पाटील चाकणकर यांच्यावर त्यांच्याच पक्षातील नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी तोफ डागली आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून पद सोडावं अशी मागणी ठोंबरे पाटील यांनी केली. चाकणकरांचा राजीनामा गरजेचा आहे. त्या पदावर असतील तर पोलीस तपासात हस्तक्षेप होईल, असे रूपाली पाटील म्हणाल्या.
रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी विरोधकच नव्हे तर त्यांच्या पक्षातूनही केली जात आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणातही रूपाली चाकणकरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप झाला होता. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात पीडित डॉक्टरच्या खासगी आयुष्याबद्दल आणि चारित्र्याबद्दल केलेल्या टिप्पण्यांमुळे चाकणकरांवर टीका झाली होती. आता अशोक खरातचे धुतलेले पाय, त्याच्यावर धरलेली छत्री यामुळे चाकणकरांच्या डोक्यावरील महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची छत्री धोक्यात आली आहे.
