मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड -चांदवड महामार्गावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सिमेंटच्या विटा घेऊन एक ट्रक जात होता. पण अचानक समोरून एका भरधाव वाहनाने कट मारला. त्यामुळे सिमेंटच्या विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचं गाडीवर नियंत्रण सुटलं आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमधील मजूर विटाच्या ढिगाराखाली सापडले. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला. मजुरांनी विटाचा ढिगार बाजूला करून मजुरांना बाहेर काढलं.
advertisement
पण, या भीषण अपघातात ट्रक खाली दबून एक आई आणि तिच्या 4 आणि 2 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन जखमींना बाहेर काढलं. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात ४ मजूर जखमी झाले होते. जखमींना तातडीने चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे सगळे सर्व मजूर मध्य प्रदेशातील असल्याचं समजत आहे. ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी काळाने आई आणि तिच्या 2 चिमुकल्यावर घाला घातल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात वाहनाचा शोध घेत आहे.
