ताण वाढला की शरीरातील कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे हृदयाचे ठोके जलद होतात, रक्तदाब वाढतो आणि स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. याचा थेट परिणाम म्हणून डोकेदुखी, सतत थकवा जाणवणे, झोप न लागणे, पचनाचे विकार, अॅसिडिटी आणि चिडचिडेपणा यांसारख्या तक्रारी वाढतात. अनेकांना यामुळे कामात लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
advertisement
Success Story : शेतकऱ्यानं शेतीत लावलं डोकं, बेदाणा विक्रीनं पालटलं नशीब, 14 लाखांची कमाई
दीर्घकाळ ताणतणाव कायम राहिल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी सर्दी, खोकला, ताप आणि विविध संसर्गजन्य आजार वारंवार होऊ लागतात. काही जणांमध्ये भूक न लागणे, तर काहींमध्ये अतिखाण्याची सवय लागते. यामुळे वजन घटणे किंवा झपाट्याने वाढणे अशा समस्या निर्माण होतात, ज्याचा एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, सततचा मानसिक दबाव हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि स्थूलपणा यांचा धोका वाढवतो. मेंदूवर ताण पडल्याने स्मरणशक्ती कमी होते, एकाग्रतेचा अभाव निर्माण होतो आणि निर्णयक्षमता घटते. महिलांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी वाढतात, तर पुरुषांमध्ये हार्मोनल असंतुलन दिसून येते. तसेच केस गळणे, त्वचारोग आणि अकाली वृद्धत्वाची लक्षणेही आढळतात.
ताणतणावावर वेळीच उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. नियमित व्यायाम, योगासने, ध्यानधारणा, पुरेशी झोप आणि संतुलित आहार यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. सकारात्मक विचारसरणी ठेवणे, वेळेचे योग्य नियोजन करणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे ठरते. ताणमुक्त जीवनशैली अंगीकारल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखता येईल, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत.





