यज्ञेश सातार्डेकर यांनी चेन्नईमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असून त्यांनी काही नामांकित फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम केले आहे. पुढे ते फोटोग्राफी व्यवसाय करत होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये फोटोग्राफीचे काम बंद झाल्यानंतर त्यांनी घरातूनच छोट्या प्रमाणात क्लाऊड किचन सुरू केले. सुरुवातीला घरगुती मालवणी पदार्थ ग्राहकांना देण्यास सुरुवात झाली आणि त्यालाच पुढे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर बोरिवलीच्या आयसी कॉलनीत पोटली बाबा सुरू करण्यात आले.
advertisement
Kitchen Hacks : भेंडीची भाजी बनवताना 'ही' युक्ती वापरा, अजिबात चिकट होणार नाही! मुलं आवडीनं खातील
या किचनची खासियत म्हणजे घरगुती चवीचे मालवणी पदार्थ. यज्ञेश यांनी कोकणातील घरांमध्ये बनणाऱ्या पदार्थांचा अभ्यास करून मसाले आणि चवीचा समतोल तयार केला आहे. त्यामुळे येथे मिळणाऱ्या पदार्थांमध्ये घरची चव जाणवते. येथे अनेक पदार्थ ग्राहकांसमोर लाईव्ह बनवले जातात. माशांचे पदार्थ डीप फ्राय करण्याऐवजी शॅलो फ्राय करून दिले जातात. त्यामुळे माशांची चव आणि ताजेपणा टिकून राहतो.
मेनूमध्ये सुरमई फ्राय, बांगडा फ्राय, पापलेट फ्राय, फिश करी, चिकन मालवणी असे अनेक पदार्थ मिळतात. त्यासोबत सोलकढीही दिली जाते. मालवणी जेवणासोबत भाकरी हा नेहमीचा पर्याय असतो, मात्र येथे भाकरीसोबत आंबोळी आणि घावणे हेही पर्याय दिले जातात. भाकऱ्या देखील येथेच ताज्या बनवल्या जातात.
येथील आणखी एक खास गोष्ट म्हणजे पोटली. पोटली म्हणजेच मालवणी थाळी. ही थाळी सुंदर पद्धतीने सजवून ग्राहकांना दिली जाते. या पोटलीची सुरुवात सुमारे साडेसातशे रुपयांपासून होते आणि त्यामध्ये विविध मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
यज्ञेश यांच्या या चवीला केवळ सर्वसामान्य ग्राहकांचाच नव्हे तर अनेक कलाकारांचाही प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय मराठी कार्यक्रमातील काही कलाकारही येथे खास मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तसेच काही कार्यक्रम, पार्टी किंवा खास प्रसंगी या किचनमधून जेवण मागवले जाते.





