मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्य सरकारने हाती घेतलेला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या ठिकाणी एक हजार प्रवाशांना राहता येईल, अशी प्रवासी निवास सुविधा देखील असेल.
राज्य एसटी महामंडळाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरमध्ये पूर्वीपासून महामंडळामार्फत एक आधुनिक बसस्थानक उभारण्यात आलेलं आहे. त्या माध्यमातून वर्षभरात लाखो प्रवासी पंढरपूरमध्ये ये-जा करतात. पण, आषाढी आणि कार्तिकी या प्रमुख वाऱ्यांदरम्यान हे बसस्थानक अपुरं पडतं. या समस्येचं निराकरण करण्यासाठी, एसटी महामंडळाने आपल्या 11 हेक्टर जमिनीवर 34 प्लॅटफॉर्म्स असलेलं 'चंद्रभागानगर यात्रा बस स्थानक' बांधलं आहे. तसंच, दररोज येणाऱ्या भाविकांना माफक दरात निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी बसस्थानकाजवळच प्रवासी निवासस्थान बांधण्यात आलं आहे,'द टाइम्स ऑफ इंडिया'ने या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
advertisement
प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, या निवासस्थानात एका वेळी अंदाजे एक हजार यात्रेकरू राहू शकतात. त्याचबरोबर, एसटी कर्मचारी आणि यात्रेकरूंच्या जेवणासाठी दोन सुसज्ज कँटिनही बांधण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरमध्ये राज्यभरातून एसटी बस येतात. येणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास चांगला आणि सुरक्षित व्हावा, या उद्देशाने हे नवीन अत्याधुनिक बस स्थानक उभारण्यात आलं आहे. सध्या पंढरपूरची आषाढी वारी सुरू आहे. आषाढी एकादशीनिमित्त आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी लाखो वैष्णवांचा मेळा चंद्रभागेच्या तिरी जमा झाला आहे.
