चंद्रपूर महानगरपालिकेचा निकाल लागल्यानंतर काँग्रेस सत्ता स्थापन करणार, अशी अपेक्षा होती. मात्र, आमदार वडेट्टीवार आणि खासदार धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद अधिकच चिघळत चालला आहे. चंद्रपूर महापालिकेत एकूण 67 सदस्य संख्या असून 34 हा बहुमताचा आकडा आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजपकडे 24 नगरसेवक आहेत, तर ठाकरे गटाचे 6, वंचित बहुजन आघाडीचे 2 आणि इतर 2 नगरसेवक आहेत. या 24+ 6 + 2 + 2 अशा फॉर्म्युल्यावर सध्या चर्चा सुरू असून भाजप सत्तास्थापनेचा दावा मजबूत करण्याच्या तयारीत आहे.
advertisement
सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू
सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटाचे 6, वंचितचे 2 आणि इतर 2 असे एकूण 10 नगरसेवक लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या हालचाली काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानल्या जात आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत वादही भाजपसाठी संधी ठरत असल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार आणि धानोकर गटातील मतभेद उघडपणे समोर आल्याने पक्षाची एकजूट कमकुवत झाल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापनेच्या हालचाली वेगाने सुरू केल्याचे दिसून येते.
सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित
दरम्यान, या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार अनुपस्थित असल्याची बाबही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या अनुपस्थितीमागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. एकंदरीत, चंद्रपूर महापालिकेत आगामी काळात सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता असून भाजप काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
