मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या रास्त दर धान्याच्या मासिक वाटपात पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे. राज्यातील अंत्योदय अन्न योजना (AAY) आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी (PHH) योजनेंतर्गत धान्य वितरणाचे प्रमाण जानेवारी 2026 पासून नव्याने निश्चित करण्यात आले आहे. यामुळे लाखो शिधापत्रिकाधारकांच्या मासिक धान्य मिळकतीत बदल होणार असून, पुरवठा विभागाने याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
advertisement
नवीन निर्णय काय?
नव्या निर्णयानुसार, जानेवारी 2026 पासून अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू देण्यात येणार आहे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रत्येक सदस्यासाठी दरमहा 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू वाटप करण्यात येईल. हा बदल राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ तरतुदींनुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
खरं तर, या योजनांतील धान्य वितरणाच्या प्रमाणात गेल्या काही काळात बदल करण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात अंत्योदय कार्डधारकांना 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू दिले जात होते. मात्र नंतर पुरवठा विभागाने तात्पुरता बदल करत अंत्योदय लाभार्थ्यांसाठी 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असे वितरण सुरू केले होते.
या बदलामुळे तांदळाचे प्रमाण वाढले असले तरी गव्हाचे प्रमाण कमी झाले होते. अनेक भागांत लाभार्थ्यांनी या बदलाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. काही ठिकाणी तांदळाची मागणी अधिक असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले, तर गहू कमी झाल्यामुळे काही कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे आता पुन्हा मूळ प्रमाण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे की डिसेंबर 2025 महिन्यासाठी सध्या सुरू असलेलेच वितरण प्रमाण कायम राहणार आहे. म्हणजेच डिसेंबरमध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू, तर प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 4 किलो तांदूळ आणि 1 किलो गहू असेच धान्य मिळणार आहे. या महिन्यात कोणताही बदल लागू होणार नाही.
जानेवारी 2026 पासून मात्र नव्याने निश्चित केलेले प्रमाण लागू होईल. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी या बदलाची माहिती लक्षात घेणे आवश्यक आहे. रास्त दर दुकानांवर होणाऱ्या वाटपात त्यानुसार नियोजन केले जाणार असल्याने, लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेवरील सदस्यसंख्या आणि धान्याचे प्रमाण तपासून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
राज्यातील गरीब, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे धान्य वितरणात होणारे बदल थेट त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे ठरतात. जानेवारी 2026 पासून लागू होणाऱ्या नव्या प्रमाणामुळे तांदूळ आणि गहू यामधील संतुलन पुन्हा साधले जाणार असून, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील मूळ उद्दिष्टांनुसार धान्य वाटप केले जाणार आहे.
