अधिवेशन सुरू असतानाच विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे रमी खेळत असल्याचा आरोप झाला. याचा व्हिडिओही समोर आला. विरोधकांनी या मुद्यावर होत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आणि महायुतीला जोरदार घेरण्याचा प्रयत्न केला. कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, कोकाटे यांना कॅबिनेटमध्ये कायम ठेवत त्यांच्याकडील खाते बदलण्यात आले.
छगन भुजबळांचा गौप्यस्फोट...
advertisement
नाशिकमध्ये आज राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. भुजबळ यांनी म्हटले की, आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो, त्यावेळेला अजितदादांनी अर्थ खाते घेतलं. त्यानंतर बाकीचे खाते माझ्यासमोर ठेवले. तुम्हाला जे खाते पाहिजे आहे ते घ्या. त्यावेळी आम्ही चर्चा केली. मात्र, माझं राजकारण मुंबईत झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जाण असलेल्या नेत्याला हे खातं देण्याची विनंती केली होती, असे भुजबळांनी सांगितले. अजित पवारांनी आपण कृषी खात्याचा पदभार घ्यावा, यासाठी आग्रह केला. मात्र, मी भूमिकेवर ठाम राहिलो असल्याचे भुजबळांनी सांगितले.
दत्तामामा खात्याला न्याय देतील...
कृषी खात्याचा भार आता दत्ता भारणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. त्यावर बोलताना भुजबळ यांनी म्हटले की, आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो. पण त्याची बारीकसारीक माहिती देणारे माणसे ग्रामीण भागात असतात त्यामुळे दत्ता भारणे या खात्याला न्याय देतील, असे भुजबळांनी सांगितले. प्रत्येक खातं हे महत्त्वाचं असल्याचे त्यांनी सांगत आपण कसे काम करतो, यावर त्याचे मूल्यमापन अवलंबून असल्याचेही भुजबळांनी म्हटले.