अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती दिसून आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसरीकडे एबी फॉर्मवरून काही ठिकाणी राडा झाल्याचे दिसून आले. आता, एका उमेदवाराचा एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याने लपवला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. एबी फॉर्म नसल्याने उमेदवाराला अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले आहे.
advertisement
महापालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेदरम्यान मोठा वाद निर्माण झाला असून, निवडणूक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांनी एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म तांत्रिक कारण देत लपविल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या झोन क्रमांक १ मधून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म निवडणूक कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. मात्र अर्ज छाननीदरम्यान हा बी फॉर्म ग्राह्य न धरता उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित करण्यात आले. या निर्णयामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी लतिफ पठाण यांना त्यांच्या दालनातच जाब विचारत चांगलाच घेराव घातला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कार्यकर्ते थेट अधिकाऱ्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. “आम्ही दिलेला बी फॉर्म तुम्ही स्वीकारला, मग तो अर्जासोबत जोडला का नाही? फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही?” असे थेट सवाल करत कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.
या घटनेनंतर निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप झाल्याचा आरोप होत असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडिओमुळे जालना महापालिका निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, निवडणूक प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
