मुकेश साळवे असं गुन्हा दाखल झालेल्या कुख्यात गुंडाचं नाव आहे. साळवेनं ज्याच्यावर हल्ला केला, तो देखील सराईत गुन्हेगार आहे. बाळू मळके असं जखमी सराईताचं नाव आहे. ही घटना मंगळवारी (२ सप्टेंबर) सकाळी सिडको मैदानाजवळील विसर्जन विहिरीपाशी घडली. या हल्ल्यात बाळू भागाजी मकळे (२८, रा. मुकुंदनगर) हा गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश साळवे हा मोक्का अंतर्गत कारवाई झालेला सराईत गुन्हेगार आहे. या प्रकरणात त्याला तुरुंगवास देखील झाला होता. दोन दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून सुटला. तुरुंगातून सुटताच त्याने आपला मित्र आणि सराईत गुन्हेगार बाळू मळके याच्यावर कोयत्याने हल्ला केला. जखमी बाळू मकळे याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो मुकेश साळवे आणि बाबासाहेब शिंदे यांच्यासोबत सिडको मैदानात 'चामफूल' हा जुगाराचा खेळ खेळत असताना आकड्यांवरून त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि मुकेशने शिवीगाळ करत स्वत:ला मुकुंदवाडीचा दादा म्हणत बाळूला जीवे मारण्याची धमकी दिली.
रागाच्या भरात मुकेशने कोयता काढून बाळूच्या डोक्यावर सपासप दोन वार केले. यात बाळू रक्तबंबाळ झाला. तिसरा वार चुकवून तो लगेच पळून गेला आणि थेट मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलिसांनी तत्काळ त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. विशेष म्हणजे, हल्ला झालेला बाळू मकळे याच्यावरही चोरी आणि चेन स्नॅचिंगसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुकेश साळवेवर यापूर्वी १६ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल असून तो अनेकदा तुरुंगात राहिला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.