निकीता रवींद्र पवार असं आत्महत्या करणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती मुळची अहिल्यानगर जिल्ह्याच्या वाळुंज पोही गावातील रहिवासी आहे. अलीकडेच तिने फार्मसीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर ती संभाजीनगरमध्ये नोकरीसाठी आली होती. इथं ती आपल्या दोन मैत्रिणींसह राहत होती. घटनेच्या दिवशी दोन्ही मैत्रिणी घरी गेल्या होत्या. याचवेळी निकीताने गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे.
advertisement
'मम्मी, दादा, आजी, आजोबा मला माफ करा, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल,' अशी भावनिक सुसाईड नोट लिहून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने कुटुंबीयांना फोन करून त्यांच्या मोबाईलवर येणारा कॉल ब्लॉक करण्याची विनंती केली होती. यानंतर लगेचच २५ वेळा अज्ञात नंबरवरून कुटुंबीयांना कॉल आल्याने, तरुणीच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे, याबाबत गूढ निर्माण झालं आहे.
नेमकं काय घडलं?
निकिता रवींद्र पवार संभाजीनगरमध्ये एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करत होती. घटनेच्या दिवशी ती रूमवर एकटीच होती. सायंकाळी, शेजारी राहणाऱ्या मैत्रिणी तिला जेवणासाठी बोलवायला गेल्या. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी खिडकीतून पाहिले असता, निकिताने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. हे दृश्य पाहून घाबरलेल्या मैत्रिणींनी तत्काळ घटनेची माहिती घरमालकाला दिली. पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने निकिताला तातडीने घाटी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास जमादार तेलुरे करत आहेत.
आत्महत्येपूर्वीचा संशयास्पद कॉल
आत्महत्येच्या एक दिवस आधी निकिताने आपल्या कुटुंबीयांशी फोनवरून संवाद साधला होता. त्यावेळी ती खूप घाबरलेली होती, असे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. तिने कुटुंबीयांना, 'तुमच्या मोबाईलवर एक कॉल येईल, तो तुम्ही ब्लॉकलिस्टमध्ये टाका, त्याचा कॉल घेऊ नका' अशी विनंती केली होती. तिच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, निकिताचा कॉल कट झाल्यानंतर लगेचच कुटुंबीयांच्या नंबरवर २५ वेळा अनोळखी नंबरवरून कॉल आले होते.
ब्लॅकमेलिंगचा संशय
निकिताने कुटुंबीयांना असा कॉल का सांगितला? तिला कोणी ब्लॅकमेल करत होते का? तो २५ वेळा कॉल करणारा अनोळखी नंबर कोणाचा होता? असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित आहेत. पोलिसांनी निकिताचा मोबाईल जप्त केला असून, तिच्या कॉल डिटेल्सवरून पोलीस तपास करत आहेत. या तपासातूनच तिच्या आत्महत्येमागील नेमकं कारण आणि त्या २५ कॉल्सचं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.