पीडित तक्रारदार हे निवृत्त पोलिस निरीक्षक असून त्यांच्या मुलीसाठी पुणे येथील जगदीश लिहितकर (निवृत्त मुख्य अभियंता) यांच्या मुलाचे स्थळ आले होते. सुरुवातीला लिहितकर कुटुंबाने स्वतःची आर्थिक व सामाजिक प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात मांडत विश्वास संपादन केला. त्यानंतर 12 मे 2025 रोजी शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटात साखरपुडा पार पडला.
देवा, हे काय झालं? ‘लक्ष्मी’ घरात आली अन् ‘माऊली’ निघून गेली, छ. संभाजीनगर हळहळलं!
advertisement
साखरपुड्यानंतर मात्र वरपक्षाकडून मागण्यांचा सिलसिला सुरू झाला. महागडी ‘सॉलिटेअर डायमंड व्हाइट गोल्ड’ अंगठी, 10 तोळे सोन्याचे दागिने आणि घरबांधकामाच्या कारणाखाली 20 लाख रुपये रोख घेण्यात आल्याचा आरोप आहे. याशिवाय साखरपुड्यासाठी पंचतारांकित हॉटेलचा सुमारे 10 लाख रुपयांचा खर्चही मुलीच्या पित्यालाच उचलावा लागला.
लग्नाची तारीख जवळ येताच वरपक्षाने पुन्हा 15 तोळे सोने व इतर अवाजवी मागण्या केल्या. या मागण्या पूर्ण न झाल्यास लग्न करणार नसल्याची स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली. इतकेच नव्हे तर लग्नाची पत्रिका वाटून झाल्यानंतर अचानक व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवून लग्न स्थगित केल्याची माहिती देण्यात आली.
मुलीच्या भवितव्याचा विचार करून पीडित कुटुंबाने राज्य महिला आयोगाकडे मध्यस्थीसाठी धाव घेतली. मात्र आयोगासमोर झालेल्या बैठकीतही वरपक्षाने क्षुल्लक कारणे पुढे करत लग्नास नकार दिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच पीडित कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणात जगदीश लिहितकर, त्यांची पत्नी, मुलगा आणि जावई ऋषिकेश यशोद यांच्यासह एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी कुटुंबातील जावई हा एका विभागातील वरिष्ठ अधिकारी असून, त्याने आपल्या पदाचा दबाव वापरल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.






