भाजप नेत्यावर लोखंडी रॉड-फायटरने जीवघेणा हल्ला, पायही मोडला, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधून राजकारणाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं एका भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून राजकारणाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंचायत समिती निवडणुकीच्या उमेदवारीवरून झालेल्या वादातून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या भीषण हल्ल्यात काळे यांचा पाय फॅक्चर झाला आहे. ही घटना उघडकीस येताच शहरात खळबळ उडाली आहे.
उमेदवारी नाकारल्याचा राग, लोखंडी रॉडने हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, औराळा पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपने प्रभाकर बागूल यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र, ही उमेदवारी आपल्यालाच मिळावी, अशी आग्रही मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामदास खवळे यांनी केली होती. पक्षाने उमेदवारी नाकारल्याचा राग मनात धरून खवळे बंधूंनी सुभाष काळे यांना लक्ष्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
advertisement
शुक्रवारी (दि. २३) रात्री काळे हे औराळा येथील आपल्या कार्यालयात चर्चा करत बसले होते. यावेळी रामदास खवळे आणि त्यांचा भाऊ अंबादास खवळे तेथे आले. त्यांनी काळे यांना कार्यालयाबाहेर बोलावून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली आणि लोखंडी रॉड तसेच 'फायटर'ने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात काळे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
advertisement
या सगळ्या प्रकरणावर रामदास खवळे यांनी प्रतिक्रिया दिली असून आपण मारहाण केली नाही. शिवाय ज्यावेळी घटना घडली, तेव्हा आपण घटनास्थळी नव्हतो, असं त्यांनी म्हटलं आहे. "आम्ही अपक्ष अर्ज भरला याचा राग काळे यांना होता. त्यांनीच माझ्या भावाला दमदाटी केली. काळे स्वतःच खाली पडल्याने त्यांना दुखापत झाली आहे. मी तर त्यांना भेटायला रुग्णालयातही गेलो होतो," असा दावा खवळे यांनी केला आहे.
advertisement
या घटनेची दखल पोलिसांनी घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून पुढील कारवाई केली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या राड्यामुळे भाजपच्या अंतर्गत गोटातील नाराजी चव्हाट्यावर आली असून, वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 6:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजप नेत्यावर लोखंडी रॉड-फायटरने जीवघेणा हल्ला, पायही मोडला, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!







