छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यामध्ये रेल्वेचा मोठे जाळे झाले आहे. दररोज हजारो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. तसेच लांबच्या पल्यासाठी रेल्वेमध्ये गर्दी असते. पण जी जवळची ठिकाणे आहेत, त्याठिकाणी जाण्यासाठीही प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यामुळे एक्सप्रेस गाड्यांमध्येही प्रवाशांची गर्दी होत आहे. याच गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
नेहमी प्रवाशांनी भरलेल्या लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट, एक्स्प्रेसपूर्वी मेमू आणि डेमू रेल्वे छोट्या अंतरासाठी चालवण्यास रेल्वेने मान्यता दिली आहे. यामध्ये नांदेड-मनमाड मार्गाचा समावेश केला आहे. नांदेड ते मनमाड मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकावरून ये-जा करण्यासाठी प्रवाशांना सुविधा होणार आहे.
सचखंड, मराठवाडा, नगरसोल, नरसापूरसह इतर महत्त्वाच्या एक्स्प्रेसवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित वेळ निश्चित केली आहे. प्रमुख रेल्वेनंतर मध्यंतरी बराच काळ रेल्वे नसल्याने प्रवासी सुपरफास्ट गाड्यांमध्ये काउंटर तिकीट काढून आरक्षित डब्यातून प्रवास करतात. रेल्वे बोर्डाच्या निर्णयामुळे आता आरक्षित डब्यातून प्रवास करणारांवर आळा बसेल. प्रवाशांना नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
प्रसुतिनंतर नातेवाईक पहिला प्रश्न कोणता विचारतात? महिला डॉक्टरने सांगितलं भयानक वास्तव
नांदेड-मनमाड रेल्वेमार्गावर छोट्या अंतराच्या प्रवासासाठी वेळेत रेल्वे उपलब्ध नसल्याने प्रवासी लांबपल्ल्याच्या सुपरफास्ट आणि मेल एक्स्प्रेसमध्ये आरक्षण नसताना प्रवास करतात. रेल्वेच्या काउंटरवरून साधारण तिकीट काढून 1 ते 5 तासांचा प्रवास आरक्षित डब्यातून करतात. यामुळे आरक्षित स्लीपर क्लास, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणीतील प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
छोट्या अंतराच्या प्रवाशात तिकीट तपासणीस, सुरक्षा रक्षक वेळेवर उपलब्ध नसल्याने अनारक्षित प्रवाशांचे फावते. यासाठी रेल्वे बोर्डाने देशभरात रेल्वेसेवेचा अभ्यास करून जेमू आणि मेमूसारख्या वेगाने धावणाऱ्या गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.
छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्थानकावरील प्रवाशांचा फायदा -
नांदेड-मनमाड मार्गावरील प्रवाशांसाठी सोयीची नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, लासूर, नगरसोल आदी स्थानकांवरील प्रवाशांना महत्त्वाच्या रेल्वेच्या पूर्वी मेमू चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड येथून सकाळी 5.25 वाजता धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेसनंतर 9.30 वाजता सचखंड एक्स्प्रेस निघते.
मराठवाडा एक्स्प्रेस गेल्यानंतर 4 तास रेल्वे नसल्याने नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेसमधून प्रवासी आरक्षित डब्यात घुसतात. सचखंड एक्स्प्रेसचे आरक्षण कट ऑफ डेटपासून भरलेली असते. त्यामुळे मराठवाडा एक्स्प्रेसनंतर आणि सचखंडपूर्वी सकाळी 7.45 वाजता मेमू चालवण्यास परवानगी दिली. परतीसाठी नगरसोलहून दुपारी 4 वाजता निघण्याचा प्रस्ताव आहे. मुदखेड येथून सकाळी 6.30 वाजता रोटेगावसाठी तर परतीला रोटेगावहून 3.50 वाजता परतेल.
नगरसोल-नरसापूर छत्रपती संभाजीनगर स्थानकावर दुपारी 2 वाजता येते. त्यानंतर मराठवाडा एक्स्प्रेस सायंकाळी 5.40 वाजता येते. संबंधित गाड्यांसह रात्रीच्या साईनगर विशाखापट्टणम, अजिंठा एक्स्प्रेस आदींवरील ताण कमी करण्यासाठी रोटेगाव येथून दुपारी 3.50 वाजता डेमू अथवा मेमू चालवण्याचा पर्याय दिला आहे.