सिद्धार्थ साळवे असं पीडित ठेकेदाराचं नाव आहे. ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास ते त्यांचा मित्र स्वराज दहीवाल यांच्यासोबत पैठण रस्त्यावरील '४० ग्रीन्स' सोसायटीच्या दिशेने कारने जात होते. सोसायटीच्या थोड्या अलीकडेच आरोपींनी त्यांची कार अडवली. साळवे कारमधून खाली उतरताच आरोपी भगवान मुसळे आणि त्याच्या आणखी एका साथीदाराने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
advertisement
गुंडगिरी करून ४८ हजारांची लूट
"तुझ्याकडे जास्त पैसे झाले का, तुला माज चढला आहे, तुझा बीडचा संतोष देशमुख करतो," असे म्हणत दोघा आरोपींनी साळवे यांना रस्त्यावर पाडले आणि बेदम मारहाण केली. या गुंडगिरीमध्ये त्यांनी साळवे यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांच्या खिशातील रोख ४८ हजार रुपये हिसकावले. दरम्यान, साळवे यांचे मित्र दहीवाल यांनाही आरोपींनी धमकावले.
सकाळपर्यंत ५ लाख रुपये दे नाहीतर...
केवळ लूट करून न थांबता, आरोपींनी साळवे यांच्याकडे सकाळपर्यंत ५ लाख रुपये देण्याची मागणी केली. जर ही खंडणी पूर्ण केली नाही, तर साळवे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या गंभीर घटनेनंतर साळवे यांनी बुधवारी रात्री सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. साळवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भगवान मुसळे याच्यासह त्याच्या आणखी एका साथीदारावर खंडणी आणि हत्येचा प्रयत्न अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला. या घटनेचा अधिक तपास सातारा पोलीस करत आहेत. मध्यरात्री ठेकेदाराला रस्त्यात अडवून लूटमार आणि खंडणीची मागणी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
