देवेंद्र फडणवीस आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी महामेट्रोच्या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नागगपूर महामेट्रो, वाहतूक कोंडी, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, ठाकरे बंधूंची भेट, मंत्री शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यातील वादावर फडणवीस यांना पत्रकारांना प्रश्न विचारले.
राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या याकडे पत्रकारांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले असता, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला राज ठाकरे मातोश्रीवर गेले असतील तर त्यात राजकारण काय आणायचे? अशा गोष्टीत राजकारण पाहू नये. आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल, असे उद्धव ठाकरे सातत्याने सांगत आहेत. त्यावरच पत्रकारांनी फडणवीस यांना विचारले असता, महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते विधानसभेला दिसले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल. काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात जे आहे ते राज्याच्या मनात आहे, असे म्हणणे हे फार मोठे स्टेटमेंट असेल, असा टोला त्यांनी लगावला.
advertisement
सरकारमध्ये वाद, एकमेकांवर कुरघोडी, फडणवीस म्हणाले,...
मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री मिसाळ यांच्यावर वादावर फडणवीस म्हणाले, पत्र लिहून वाद तयार करून घेऊ नये. वाद असतील तर मला येऊन भेटले पाहिजे, बोलले पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्री एकाच शासनाचे भाग असतात, मंत्री जे अधिकार देतात, त्यानुसार राज्यमंत्री काम करत असतात. परंतु राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नसतो, असे नाही. राज्यमंत्रीही बैठका घेऊ शकतात, त्यांना तो अधिकार आहे. फक्त धोरणात्मक निर्णय घेताना त्यांना कॅबिनेट मंत्र्यांशी बोलावे लागते. मंत्री आणि राज्यमंत्री दोघांनीही बोलले पाहिजे. संवाद ठेवला पाहिजे, सामंजस्य दाखवले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले.
एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक, फडणवीस म्हणाले...
पुणे रेव्ह पार्टीत एकनाथ खडसे यांचे जावई खेवलकर यांना अटक करण्यात आले आहे. यावर विचारले असता फडणवीस म्हणाले, यासंबंधीच्या बातम्या मी माध्यमांतून पाहिल्या आहेत. यावर मी सविस्तर माहिती घेतली नाहीये. पोलिसांनी रेव्ह पार्टीवर छापा टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ण माहिती घेतल्यावर यावर मी अधिक बोलेन, असे ते म्हणाले.