आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेचे सर्व नसले तरी काही मंत्री उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर लगेचच शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी मांडली. डोंबिवलीतील अलीकडील पक्षप्रवेशामुळे पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाची जाणीव त्यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.डोंबिवली भाजप प्रवेशामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात मोठा असंतोष उसळला असून याचे पडसाद थेट कॅबिनेट बैठकीपर्यंत पोहोचले.
मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच शिवसेना गटातील मंत्र्यांनी अचानक नाराजी व्यक्त करत बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हे सर्व मंत्री थेट मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात पोहोचले. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपात सुरू असलेले पक्षप्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील जागावाटप आणि स्थानिक पातळीवर पक्षाला खिंडार पाडण्याच्या मुद्द्यांवरून शिवसेना मंत्र्यांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे.
advertisement
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे गटाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे गटाला खडे बोल सुनावले. त्यांनी म्हटले की, “उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्हीच केली. तुम्ही करणार असाल तर चालवून घ्यायचे, आणि भाजपाने केले तर चालणार नाही, असे होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. येथून पुढे एकमेकांच्या पक्षात प्रवेश देऊ नका. नियम दोन्ही बाजूंसाठी समान असतील, आणि पथ्य दोन्ही पक्षांनीच पाळायचे अशी सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपातील इनकमिंगमुळे शिवसेनेत अस्वस्थता
अलीकडेच ठाणे, कल्याण, अंबरनाथसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि नेता भाजपात प्रवेश करत आहेत. यामुळे शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.विशेष म्हणजे,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या असताना भाजपकडून सुरू असलेला आक्रमक पक्षविस्तार हा शिंदे गटासाठी धोक्याची घंटा मानली जाते.
