महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला दिवंगत नेते एनडी पाटील यांच्या पत्नी माई पाटील, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार रोहित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवार, रोहित पवार, जयंत पाटील या सगळ्यांनीच एकमेकांना जोरदार चिमटे काढले.
advertisement
रोहित पवार-अजित पवार यांची जुगलबंदी
माझ्या भाषणाबाबतीत अजित पवार आधी मला सूचना द्यायचे. एकदा विधानसभेतील भाषण झाल्यानंतर त्यांनी मला फोन केला. शर्टची बटने लावत जा... अशी सूचना त्यांनी केली. तसेच भाषण चांगले झाले, अशी दादही दिले. पण तेच अजितदादा आता गावकीकडे जास्त लक्ष देतात, भावकीकडे कमी लक्ष देतात, अशी तक्रार रोहित पवार यांनी केली. त्यावर अजित पवार यांनीही षटकार मारला. मी लक्ष दिले म्हणूनच तू आमदार झाला, अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली.
काकांच्या टीकेला पुतण्याचे दोन तासात उत्तर
१२०० मतांनी आमदार झालास, या अजित पवार यांच्या टीकेला रोहित पवार यांनीही तितकेच तिखट उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समोर आणले आहे. कदाचित १ लाख २० हजार मतांनी मी विजयी झालो असेल पण माझ्यापुढचे दोन शून्य कट झाले असतील... ९० मतदारसंघ असे आहेत की बॅलेट पेपरवर आमचेच उमेदवार निवडून आले आहेत. पण झालंय असं की ईव्हीएममध्ये घोटाळा झालेला आहे, त्यामुळे आमच्या लोकांना पाडण्यात आले, असे रोहित पवार म्हणाले.