थंडीची लाट कायम राहणार
सध्या राज्यात शीत लहरीची स्थिती विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणाच्या काही भागांत मागील पाच दिवसांपासून सातत्याने नोंदवली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील किमान तापमानाचा पारा आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात पुढील तीन दिवसांत हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. मात्र, यानंतर लगेचच पुढील दोन ते तीन दिवसांत तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
advertisement
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला यलो अलर्ट
राज्यातील अनेक भागांत आज रात्री आणि उद्या सकाळी थंडीची लाट कायम राहणार आहे. विशेषतः उत्तर आंतरिक महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड आणि उत्तर आंतरिक ओडिशात शीत लहरीची स्थिती जाणवेल, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. १२ आणि १३ डिसेंबरच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तेलंगणा आणि उत्तर आंतरिक ओडिशामध्ये ही शीत लहरीची स्थिती कायम राहील.
या जिल्ह्यांसाठी अलर्ट
नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमान घसरणार असून यलो अलर्ट 48 तासांसाठी देण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडीची लाट तीव्र होत असून तिथून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडी पडली आहे. नागरिकांना आणि शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
