मुंबईत महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्र लढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष होते. विशेष म्हणजे राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेल्याने महायुतीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. याच पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षासोबत जायला नको, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.
पक्षाने स्वबळावर लढावे हीच आमची भूमिका
भाई जगताप म्हणाले, मी जेव्हा मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा माझी भूमिका हीच होती आणि आताही आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढाव्यात. कारण या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांना या निवडणुकांत संधी मिळते. त्यांचे नेतृत्व घडत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने स्वबळावरच लढाव्यात.
advertisement
आमची एक बैठक झाली. या बैठकीला प्रभारी रमेश चेन्निथला उपस्थित होते. पक्षाने स्वबळावर लढावे अशी भूमिका मी त्यावेळी मांडली. अनेक लोकांनी अशाच प्रकारचे मत मांडले. अध्यक्ष असताना मांडलेली भूमिका आणि आत्ताची भूमिका यात कोणताही बदल झालेला नाही, असे जगताप म्हणाले.
स्वबळावर लढावे ही माझी भूमिका, पण पक्षाचा निर्णय अखेरचा
कोणासोबत युती-आघाडी करायची हे सर्वस्वी हायकमांड ठरवत असते. पक्षाची भूमिका हे पक्षाच्या प्रमुखांनी ठरवायची असते. आम्ही मांडलेले विचार पक्षाने शंभर टक्के स्वीकारावे असे काही नाही. शेवटी लोकशाहीत मतमतांतरे असतात, अनेक मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा होते, असेही जगताप म्हणाले.
मुंबईत काँग्रेसचाच महापौर बसेल किंवा काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसेल
स्वबळावर लढून नंतर युती होऊ शकते असे अनेक वेळा झालेले आहे. आम्ही आमची भूमिका मांडली. आता पक्षाने निर्णय घ्यायचा आहे. पक्ष जो निर्णय घेईल ते आम्ही करू. पण मी हे नक्की सांगतो की काँग्रेसच्या मदतीशिवाय महापौर बसणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसचाच महापौर बसणार, असे मोठे वक्तव्य जगताप यांनी केले.