सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत निर्माण झालेला संघर्ष अजूनही सुरूच आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात बोलणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर विश्वजित कदम यांनीही विशाल पाटील यांच्या विजयानंतर आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसच्या एकीत विघ्न आणणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली असंही कदम यांनी म्हटलं. एकीत विघ्न आणणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली असा हल्लाबोल विश्वजित कदमांनी केला. तसंच प्रत्येकाला उत्तर देणार असा इशाराही विश्वजित कदमांनी दिला. विश्वजित कदमांचा रोख जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडे असल्याचं बोललं जातंय.
advertisement
सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या आरोपांना योग्य उत्तर देणार असंही कदमांनी ठणकावलं. नुकताच सांगलीत नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विश्वजीत कदमांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विश्वजित कदमांना सबुरीचा सल्ला दिलाय.
सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना फक्त जत विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली नव्हती. मात्र सांगली विधानसभा मतदारसंघासह इतर पाच मतदारसंघात विशाल पाटील यांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे त्यांचा 1 लाख मतांनी विजय झाला होता. मात्र आता सुरू झालेल्या सुंदोपसुंदीमुळे मविआत चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संजय राऊतांवर विश्वजीत कदम यांचा रोख असल्यानं शिवसेना ठाकरे गटाकडूनही उत्तर देण्यात आलं.
विजयानंतर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत असल्याचं विशाल पाटील, विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र असं असलं तरी आता सांगलीत विधानसभा निवडणुकांमध्येही संघर्षाची चिन्हं आहेत. कारण दोन दिवसांपूर्वी इस्लामपूरमधील मेळाव्यात जयंत पाटील यांनी विद्यमान तीन जागांसह आणखी एक जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याची घोषणा केलीय. तर दुसऱ्याच दिवशी विश्वजित कदम यांनी जिल्ह्यातील 5 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय. परिणामी लोकसभेपाठोपाठ विधानसभेलाही महाविकास आघाडीत सांगलीवरुन संघर्षाची चिन्हं निर्माण झाली आहेत.