राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाचे १४ डिसेंबर रोजी सूप वाजणार आहे. त्यानंतर तब्बल सात-आठ वर्षे रखडलेल्या या निवडणुकांची घोषणा १५ डिसेंबरनंतर केव्हाही होऊ शकते, अशी विश्वसनीय माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबच आचारसंहिता लागू होईल आणि निवडणूक प्रक्रियेला वेग येईल, अशी माहिती समोर आली आहे. आगामी १५ डिसेंबर रोजी राज्यातील १०० हून अधिक मोठ्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच १५ डिसेंबरनंतर निवडणूक आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आणखी वाढली आहे.
advertisement
२७ महानगरपालिकांमध्ये मार्ग मोकळा
राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी नागपूर आणि चंद्रपूर येथे ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आहे. मात्र उर्वरित २७ महानगरपालिका निवडणुकांसाठी मार्ग खुला झाला असल्याचे संकेत आधीच निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यामुळे आता पुढील आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महापालिकांसाठी कधी होणार मतदान?
सुप्रीम कोर्टाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक प्रक्रिया फक्त ३० दिवसांत पूर्ण केली जाणार आहे. २०१७ मध्ये घोषणा आणि मतदान यात दोन महिन्यांहून अधिक अंतर होतं. मात्र यावेळी एका महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत.
निवडणूक आयोग १४ किंवा १५ जानेवारी रोजी मतदान घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे सोमवारी किंवा शुक्रवारी मतदान झाल्यास नागरिक सुट्ट्या जोडून बाहेर पडतात आणि मतदानाची टक्केवारी घसरते, हा अनुभव लक्षात घेऊन १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी अशा दिवशी मतदान होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई महापालिकेसाठी कधी मतदान?
राज्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही मुंबई महापालिकेची होणार आहे. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे ठाकरे बंधू विरुद्ध महायुती अशी लढत होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची असणार आहे. शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेचे मैदान राखण्याचे आव्हान असणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक ही जानेवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे.
