भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या इशाऱ्यानुसार, बंगालच्या उपसागरात एक नविन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. 23 मे ते 28 मे दरम्यान या वादळाचा जोर वाढण्याची चिन्हं आहेत. या चक्रीवादळाला ‘शक्ती’ असं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. याआधी 16 ते 18 मे या काळात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल, अशी हवामान खात्याची माहिती आहे.
advertisement
अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल...
या पार्श्वभूमीवर, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तरेकडील भागातून नैर्ऋत्य मान्सूनचा प्रवेश झाल्याचंही नोंदवण्यात आलं आहे. मान्सूनच्या आगमनामुळे वातावरणात आधीच आर्द्रता वाढली असून, यामुळे देशाच्या विविध भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्नाटकमध्ये यलो अलर्ट
16 मेपर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. मान्सूनपूर्व पावसाच्या सरी या भागात पडू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
कोलकात्यातही पावसाची शक्यता
कोलकातामध्ये पुढील 24 तासांत संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
या राज्यांमध्येही पावसाचा अंदाज
आज गुजरात, कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, केरळ, झारखंड, आंध्र प्रदेशातील किनारी भाग, यानम आणि पुद्दुचेरीसह अंतर्गत कर्नाटकमध्येही हलक्यापासून मध्यम पावसाचा अंदाज आहे.