नेमकी घटना काय घडली?
उत्तम जिनाप्पा मोहिते (वय ४१, रा. गारपीर चौक, सांगली) असं हत्या झालेल्या राजकीय पदाधिकाऱ्याचं नाव आहे. ते दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्यात कार्यरत होते. ते अनेक हटके आंदोलनांसाठी प्रसिद्ध होते. मंगळवारी त्यांचा वाढदिवस होता, त्या निमित्ताने गारपीर चौक येथील घरासमोर स्टेज उभारून जंगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
advertisement
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख शेख हा त्याच्या काही साथीदारांसह या कार्यक्रमाच्या ठिकाणी आला. त्याने जेवणाचा आस्वादही घेतला. मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने हे टोळके उत्तम मोहिते यांच्याजवळ गेले आणि त्यांच्याजवळ असलेल्या धारदार हत्याराने उत्तम मोहिते यांच्या पोटात व मानेवर सपासप वार केले.
जमावाकडून संशयितास बेदम चोप
या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला आणि मोहिते गट व संशयित टोळक्यामध्ये मोठी धुमश्चक्री झाली. गंभीर जखमी अवस्थेत उत्तम मोहिते यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, संतप्त जमावाने खुनी हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित शाहरुख शेख याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावरही शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.
शहरभर पोलीस बंदोबस्त
या घटनेनंतर सांगली शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, समाज माध्यमांवर या घटनेची जोरदार चर्चा सुरू होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घटनास्थळी आणि शासकीय रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला होता. समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. या निर्घृण खुनामुळे सांगली शहराच्या शांततेला गालबोट लागले आहे.
