महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या आणि त्यांना साथ देणाऱ्या कुणालाही सोडलं जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. याबाबतचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
"खरातचा भांडाफोड आम्हीच केला"
खरात प्रकरणावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले, "खरात यांचं प्रकरणं अत्यंत गंभीर आहे. इंटेलिजन्सच्या आधारवर आम्ही स्वत: याचा भांडाफोड केला आहे. आम्हाला आधीच कल्पना होती की लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीत. आता पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना धीर देऊन त्यांना समोर आणायचा प्रयत्न सुरू आहे. यात यशही येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जात आहे. स्वत: डीजींनी याकडे लक्ष द्यावं, अशा सूचना मी दिल्या आहेत. एसआयटी तयार केली आहे. यात कुणालाही सोडलं जाणार नाही."
advertisement
"याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी निश्चित आणून द्यावा, त्याच्यावर कारवाई होईल, विनाकारण राजकीय रंग देऊ नये", असंही फडणवीस म्हणाले
'सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे'
फडणवीसांनी पुढे सांगितलं की, "खरातकडे अनेक राजकीय लोक जायचे, विरोधकही जायचे. विरोधक कोण कोण गेले, याचे पुरावे मी देऊ शकतो. सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. ते पोलिसांकडे आहेत. ते पोलिसांचं काम आहे, ते माझं काम नाहीये. पण खरातांना भेटणाऱ्यांपैकी कुणाचा सहभाग असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल, फक्त कुणीतरी भेटलं म्हणून कारवाई करता येणार नाही, असं केलं तर अनेकांची नावं समोर येतील. त्यांना ४० किमी पाण्याची लाईन कुणी आणि कशी दिली, याबाबत काल मीडियांनी दाखवलं आहे. त्यामुळे याचं राजकारण करू नये. हा महिलांच्या सन्मानाचा प्रश्न आहे. त्यामुळे आरोपींना शिक्षा भोगावीच लागेल, यासाठी सरकार आणि पोलिसांना जे करावं लागेल, ते सगळं करू."
