नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील वादावादी समोर आली. त्यामुळे महायुतीमध्ये फारसं आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. राज्यात भाजपसोबत असलेल्या धुसफूसीचा मुद्दा दिल्लीतही पोहचला. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडला. आयएएस अधिकारी नार्वेकर हे संजय राऊत यांचे व्याही आहेत. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रम म्हणून संजय राऊत कुटुंबासह या विवाहाला उपस्थित होते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विवाह सोहळ्याला उपस्थित राहत नव दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.
दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यात २० मिनिटं चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत विचारपूस करत उपचारांची माहिती घेतली. या विवाह सोहळ्याच्या कार्यक्रमात राज्याचे मंत्री आशिष शेलारदेखील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संजय राऊत यांच्यासोबत आशिष शेलार यांनीही संवाद साधला. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.
दरम्यान, संजय राऊत यांनी प्रकृती अस्वास्थामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणार असल्याचे जाहीर केल्यानंतर सगळ्याच नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विचारपूस करत उपचारासाठी सर्व मदत करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्याबाबत संजय राऊत यांनी त्यांचे आभारही मानले होते.
