देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या तीनही नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीची पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेची सुरुवात देवेंद्र फडणवीस यांच्यापासून झाली. गेल्या काही वर्षापासून पत्रकार परिषदेची सुरूवात ही एकनाथ शिंदे यांच्यापासून व्हायची.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना भेटून सत्ता स्थापनेचे पत्र दिल्याची माहिती दिली. त्याचसोबत राज्यात मंत्रिमंडळ स्थापन करण्याचा दावा केला आहे. हे पत्र स्विकारून उद्या 5 तारखेला शपथविधीची वेळ दिलेली आहे,अशी माहिती फडणवीसांनी दिली.
advertisement
देवेंद्र फडणवीसांनी पुढे शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले. कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेनेच्या वतीने समर्थनार्थ पत्र दिलं आहे. अजित पवारांनी देखील समर्थनार्थ पत्र दिल्याची माहिती दिली आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला आहे, पण ते उप मुख्यमंत्रीपद स्विकारण्यास आणि मंत्रिमंडळात राहण्यास देखील उत्सुक नाही आहेत.यावर फडणवीस म्हणाले, मी एकनाथ शिंदे यांना भेटून विनंती केली आहे आणि शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रिमंडळात राहावं. शिवसेनेच्या आणि महायुतीच्या आमदारांची इच्छा आहे.त्यामुळे त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल आम्हाला खात्री आहे,असे फडणवीस म्हणाले आहेत.याचाच अर्थ अजूनही शिंदेंची नाराजी दुर झालेली नाही ती अजूनही कायम आहे.
तसेच खातेवाटपावर बोलताना फडणवीस म्हणाले की, खातेवाटपाबाबतची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल. सगळे निर्णय आम्ही एकत्रितपणे घेतले आहेत आणि पुढेही आम्ही घेत राहणार आहोत, असे फडणवीसांनी म्हटलं आहे.
