बीड: मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमात पुन्हा सक्रीय झालेले राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा महत्त्वाचं वक्तव्य करताना सामाजिक परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पोलिसांना आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का, असा सवाल त्यांनी केला.
advertisement
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांनी सातत्याने निशाणा साधला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा सूत्रधार असल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड आणि त्याचे काही सहकारी तुरुंगात आहेत. या घटनाक्रमात धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाले होते. मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. प्रकृतीच्या कारणास्तव मुंडे हे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते.
बीड येथे आयोजित साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त कार्यक्रमात धनजंय मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सत्यशोधक समाज भूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. आपल्या भाषणात बोलताना धनंजय मुंडे यांनी विविध मुद्यावर भाषण केले.
महापुरुष प्रत्येक समाजाने बांधून घेतलेत...
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, बीड जिल्ह्याच्या प्रत्येक गावागावात प्रत्येकाला अनुभव आला असेल. प्रत्येकाने आपआपलेच महामानव बांधून घेतलेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती फक्त मराठा समाजाने साजरी करायची का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती फक्त मागास प्रवर्गातील लोकांनी साजरी करायची का? महात्मा फुले यांची जयंती फक्त माळी समाजाने साजरी करायची का? शिक्षणाची चळवळ महात्मा फुले यांनी सुरू केली म्हणून फक्त माळी समाजातील लोकांनी शिक्षण घ्यायचे का? भगवान बाबांची जयंती फक्त वंजारी समाजाने साजरी करायची का? असा सवाल त्यांनी केला.
ही कसली सामाजिक समता...
धनंजय मुंडे यांनी पुढे म्हटले की, मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरली नाही. बीड जिल्ह्यामध्ये पोलिसांना सुद्धा स्वतःचं आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का? असा सवाल उपस्थित केला. सर्वांनीच सर्व समाजातील लोकांनी पुढे येऊन मागे जे घडलं ते पुन्हा सरळ करण्याची वेळ आली असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना आडनाव लावण्याची सूचना केली होती. यामुळे पोलिसांमधील जातीच्या दृष्टीने एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलले असं सांगण्यात आले होते.