हत्या झालेल्या मुलीचे नाव गौरी असून ती वडिलांना दारूचे व्यसन लागल्यामुळे आपल्या आजीकडे राहत होती. आजी घरी नसताना पित्यानेच कुऱ्हाडीचे घाव घालून लहानग्या गौरीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यातच गौरी मृत पावली. रविवारी रात्रीची ही घटना आहे.
गौरी वारंवार आजारी पडत असल्याचे कारण सांगत त्यामुळेच तिचा खून केला, असे आरोपीने सांगितले. गौरी जाधव ही गावातील शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत होती. हत्या केल्यानंतर आरोपी बापाने पुरावे नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला होता पण आजीच्या सतर्कतेमुळे सत्य बाहेर आले. आंबी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
advertisement
लेकीचा खून करून बापाने सांगितले धक्कादायक कारण
पोलीस ठाणे आंबी, तालुका भूम हद्दीतील मौजे शेळगावमधील आरोपी नामे ज्ञानेश्वर जाधव याने त्याची मुलगी गौरी जाधव (वय ९) हिचा खून केला. गौरी सारखी आजारी पडते तसेच आत्ता ती सायकलवरून पडल्याच्या कारणावरून रागाच्या भरात खून केल्याचे आरोपी बापाने सांगितले आहे. गौरी रविवारी रात्री घरात झोपली होती. त्यावेळी रागाच्या भरात बापाने तिच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून तिची हत्या केली. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तत्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे, असे आंबीच्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास आंबी पोलीस करीत आहेत.