सदर तरुण आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून साक्षीने धाराशिव येथील मामाच्या घरी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. आत्महत्येच्या घटनेला एक महिना पूर्ण झाला तरीही कुटुंबियांना न्याय मिळत नाही. त्यामुळे साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे.
धाराशिव पोलिसांनी कसलेही सहकार्य केले नाही, असा आरोप साक्षीची आई कोयना विटेकर यांनी केली आहे. माझ्या मुलीसोबत जे घडले ते इतर मुलींसोबत घडू नये, त्यासाठी यातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित कुटुंबाने केली आहे. दरम्यान धाराशिव पोलिसांनी आरोपी अभिषेक कदम याला अटक केली असून त्याची जामीनावर देखील सुटका झाली आहे.
advertisement
एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र
माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली, काही मुलांनी तिची छेड काढली. आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपविले, साहेब, आम्ही आस धरुन आहोत तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहित आहे. मात्र त्या क्रुर नराधमांना देखील तेवढीच शिक्षा अपेक्षित आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एका कार्यक्रमानिमित्त आमच्या बीड जिल्ह्यात आले. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सर्वांना माहित आहे, आपण असला असता तर पिडित बहिणीला भेटल्याशिवाय गेला नसता. याची प्रचिती महाराष्ट्राला अणि लाडक्या बहिणींना आहे. साहेब, बीडमध्ये केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर (KSK) महाविद्यालय आहे, याच महाविद्यालयात कला शाखेच्या तृतीय वर्षात ती शिक्षण घेत होती. काही मुलांनी तिची छेड काढली, तिला ब्लॅकमेल करुन तिच्यासोबत अनैतिक कृत्य केले. जबरदस्ती व्हिडीओ आणि फोटो काढण्यात आले, या अत्याचाराला असह्य होवून साक्षीने मामाच्या घरी धाराशिव येथे जावून गळफास घेत आत्महत्या केली.
आम्ही बीडचे रहिवासी आहोत, आरोपीही बीडचा रहिवासी आहे. माझ्या मुलीने मामाच्या गावी गळफास घेतला, त्यामुळे गुन्हाही धाराशिव सिटी पोलिस नोंद झाला आहे. शिंदे साहेब तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, हा आम्हाला ठाम विश्वास आहे. यात अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी चुकीचे काम केले, आम्हाला अपमानित केले. आम्हाला तासंतास कार्यालयाबाहेर उभे केले.ताटकळत बसवले, याची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेरात आहेत. आरोपीची बहीण देखील पोलीस दलात आहेत. मात्र ती पोलिस दलात कार्यरत असल्याने पोलीस मदत करत नाहीत.
ज्या आरोपी मुलाने छेडखानी केली, त्याच्या मोबाईलमधील चॅटिंग पोलिसांनी अद्याप उघड केली नाही. याच दरम्यान केएसके महाविद्यालयीत दोन मुलींनी देखील आत्महत्या केली. आरोपीचे गुंडांशी संबंध आहेत. त्यामुळे इतर पालक न्यायासाठी पुढे येत नाहीत. साहेब आपण मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री असता तर आम्हाला न्याय दिला असता, आताही केवळ तुमच्याकडून आम्हाला न्यायाची आस आहे.