एकीकडे ठाकरेंचे खासदार फुटण्याबाबत विविध बातम्या समोर येत असताना, धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर महायुतीच्यावर वाटेवर असल्याचं बोललं जातंय. यावर स्वत: ओमराजेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. असं असलं तरी धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर आणि शिंदे गटात जवळीक वाढत असल्याची चर्चा आहे.
तीन दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली, या बैठकीत शिंदे गटाचे मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं म्हटलं होतं. यावर ओमराजेंनी सारवासारव केली. मात्र आता शिंदे गटाकडून ओमराजेंसाठी पायघड्या घातल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे ओमराजे निंबाळकर यांना पालकमंत्र्यांच्या कार्यालयात ऑफिससाठी मिळालेली जागा.
advertisement
खासदार ओमराजे निंबाळकर यांना सत्ताधारी पालकमंत्री कार्यालयात संपर्क कार्यालय स्थापन करण्यासाठी दालन देण्यात आली आहे. त्यामुळे पालकमंत्री आणि खासदार ओमराजेंची जवळीक वाढल्याचं बोललं जातंय. शंकरराव गडाख धाराशिवचे पालकमंत्री ओमराजे निंबाळकर यांना पालकमंत्र्याच्या दालनात जागा देण्यात आली नव्हती. अनेकदा मागणी करूनही त्यांना जागा मिळाली नव्हती. हेच चित्र तानाजी सावंत धाराशिवचे पालकमंत्री असताना होतं.
पण आता एकीकडे ओमराजे यांच्या पक्षप्रवेशची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यानंतर लगेच त्यांना कार्यालय मिळालं आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन अंतर्गत खासदारांना कार्यालय देण्याचं प्रावधान आहे. यानुसारच हे कार्यालय अलॉट करण्यात आलंय. ओमराजेंच्या जुन्या मागणीनुसारच पालकमंत्री कार्यालयात जागा उपलब्ध करून दिल्याचं स्पष्टीकरण नियोजन विभागाकडून देण्यात आलंय. मात्र जुनी मागणी आताच मंजुर झाल्याने या ओमराजेंच्या पक्षप्रवेशाबाबत सस्पेन्स वाढताना दिसत आहे. या दुर्मिळ योगाबद्दल धाराशिवमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.