बसवेश्वर पतसंस्थेची निवडणूक हरल्याने खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांना मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी निवडणुकीची रणनीती आखली होती, ती यशस्वी झाल्याची दिसते.
ठाकरे गटाला धक्का, शिंदे गटाने धूळ चारली
बसवेश्वर पतसंस्था जिल्ह्यात नावाजलेली असून दोन भावांमध्ये झालेल्या वादात ही पतसंस्थेची निवडणूक गाजली होती. त्यात खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार प्रवीण स्वामी यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही जोर लावला होता.
advertisement
ही पतसंस्था शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात गेल्याने ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे. प्रत्येक वेळी भावनिक राजकारण करून लोक मते देत नसतात, तर त्याला विकासाचेही राजकारण करावे लागते, असा टोला ज्ञानराज चौगुले यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना लगावला आहे.
मुरूम शहरातील महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीत आजी-माजी खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या निवडणुकीत सत्ताधारी सहकारी समृद्धी पॅनलने दणदणीत विजय मिळवून विरोधी पॅनलचा सुपडा साफ केला आहे.
उमरगा तालुक्यात अल्पवधीतच नावलौकिक झालेल्या या पतसंस्थेच्या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ आमने-सामने होते. ठाकरे गटाचे बसवराज वरनाळे यांनी शिंदे गटातील पतसंस्थेचे सत्ताधारी आपल्या सख्ख्या भावाविरोधात पॅनल उभे करून निवडणुकीत चुरस निर्माण केली होती. ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार आणि खासदारासह शहरातील स्थानिक मोठ्या नेत्यांनी तर शिंदे गटाकडून आजी-माजी आमदार आणि खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.
चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत पॅनल प्रमुख तथा शिंदे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मुदकण्णा यांचा नेतृत्वाखाली सत्ताधारी सहकारी समृद्धी पॅनलने एकतर्फी विजय मिळवून पतसंस्थेवर आपले निर्विवाद वर्चस्व कायम ठेवले आहे.