नेमकं काय घडलं?
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, जगदीश सिंह राणा पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्टेजसमोर गोंधळ घातला होता. त्यांनी वेगवेगळी गाणी वाजवून आणि हात उंचावून, दंड थोपटत ओमराजे यांना थेट आव्हान दिलं होतं. या घटनेनंतर ओमराजे निंबाळकर आणि जगदीश सिंह राणा पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याबाबतचे काही व्हिडीओज देखील सोशल मीडियावर समोर आले होते.
advertisement
राणा पाटलांकडून मुलाच्या कृत्याचं समर्थन
या घटनेनंतर आमदार राणा पाटील यांनी आपल्या मुलाच्या कृत्याचे समर्थन केले. त्यांनी थेट ओमराजे यांना इशारा दिला आहे. शिस्तीत राहायचं नाहीतर, शिस्तीत कार्यक्रम करू, असं राणा पाटील यांनी म्हटलं आहे. या सगळ्या प्रकरणावर राणा पाटील म्हणाले की, "गणेश विसर्जनाचा शिस्तबद्ध कार्यक्रम शिस्तीत पार पडला, यापुढे शिस्तीतच राहा, नाहीतर शिस्तीत कार्यक्रम करू," अशा शब्दांत राणा पाटील यांनी ओमराजेंना इशारा दिला आहे.
ओमराजे निंबाळकर यांचे प्रत्युत्तर
राणा पाटील यांच्या या इशाऱ्याला आता खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "या मिरवणुकीत डॉ. पद्मसिंह पाटील घराण्याचे संस्कार दिसून आले. तसेच पवनराजे निंबाळकर परिवाराचेही संस्कार दिसून आले." पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजेंची हत्या केल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर ओमराजेंनी हे वक्तव्य केलं आहे. या वक्तव्याद्वारे त्यांनी राणा पाटील यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. या नव्या वादाने धाराशिवमधील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.