तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला ८५० कोटी रुपये दिल्याबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप आमदार राणा पाटील यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या मास्टरमाईंडकडून बावनकुळेंचा सन्मान करण्यात आल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.
ड्रग्स प्रकरणातल्या आरोपीकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार, सर्वत्र टीका
तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासाठी १६६५ कोटींचा निधी मंजूर झाल्याच्या निमित्ताने भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आला. मात्र या कार्यक्रमात घडलेल्या एका घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
advertisement
कार्यक्रमात ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी विनोद ऊर्फ पिंटू गंगणे याच्या हस्ते मोठ्या क्रेनच्या सहाय्याने चंद्रशेखर बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. पिंटू गंगणे मित्र परिवाराच्या वतीने हार घालून करण्यात आलेल्या या सत्कारात मंत्री बावनकुळे यांनी गंगणेला जवळ बोलावून पाठ थोपटून त्याचे कौतुक केल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले.
भाजपच्या मंत्र्यांचा ड्रग्ज प्रकरणातील आरोपीशी घनिष्ट संबंध?
विनोद ऊर्फ पिंटू गंगणे याचे नाव धाराशिव जिल्ह्यातील एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी संबंधित असल्याचे पुरावे यापूर्वी स्थानिक पोलिस तपासात समोर आले होते. असे असताना, या आरोपी व्यक्तीकडून मंत्र्यांचा सत्कार होणे आणि त्यांच्याशी जवळीक दाखवणे हा प्रकार भाजपच्या ‘ड्रग्ज विरोधी भूमिके’वर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित करतो.
ड्रग्ज विरोधात भूमिका घेणारा भाजप जर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीच्या हस्ते सत्कार घेत असेल तर पार्टी विथ डिफरन्स म्हणण्याचा अधिकार पक्षाला आहे का? अशी विचारणा विरोधक करत आहेत.
कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
या कार्यक्रमाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.