पंकजा मुंडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात यासाठी केज तालुक्यातील मदन ईनकर या तरुणाने अनोखा नवस केला आहे. आई तुळजाभवानीची धाकटी बहीण देवी येरमाळा येथील येडेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या गुडघ्यावर चढून पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी मागणी येडेश्वरी चरणी केली आहे. गेली अनेक दिवसांपासून पंकजाताई मुख्यमंत्री व्हावे यासाठी बॅनरबाजी केली जात होती. या कार्यकर्त्याने मात्र चक्क देवीच्या मंदिराच्या पायऱ्या गुडघ्याने चालत सर केल्याने या अनोख्या नवसाची चर्चा रंगली आहे.
advertisement
परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे की धनंजय मुंडे?
मागील काही वर्षांपासून मुंडे कुटुंबांतील सदस्यच एकमेकांचे राजकीय विरोधक झाले होते. पण, आता या वर्षभरात हा संघर्ष मावळला. काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आता आमचा विरोध संपला असे सांगितले. पण, राजकीय वैर जरी संपले असले तरी आगामी निवडणुकीत परळीतून धनंजय मुंडे की पंकजा मुंडे यापैकी कोण उमेदवार असेल, हा तिढा कायम असेल. दरम्यान, परळीतून धनंजय तर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डीतून पंकजा असा यावर तोडगा निघू शकतो. तसे संकेत खुद्द पंकजा यांनी दिले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील तीन दशकांत झाले नाहीत एवढे बदल या तीन वर्षांत झाले. चांदा ते बांदा मजबूत संघटन असलेल्या शिवसेनेत फूट पडली.
वाचा - बारामती ॲग्रोला आलेली नोटीस हायकोर्टाकडून रद्द, रोहित पवारांनी एक वाक्यात दिलं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाले. हे दोन्हीही पक्ष मराठवाड्यात मजबूत आहेत. खास करून बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी भक्कम आहे. पण, बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची साथ देत युती सरकारला पाठिंबा दिला. त्यांना मंत्रिपदही मिळाले. त्यामुळे आता राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे) आणि भाजप अशा तीन पक्षांचे बळ त्यांना आहे.