हॅाटेल, मेस बंद, पण पुण्यात इथं विद्यार्थ्यांसाठी मोफत दिलं जातंय जेवण, Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक खिचडी प्रसादाच्या स्वरूपात मोफत जेवण दिले जाते.
पुणे : शहरात निर्माण झालेल्या एलपीजी सिलेंडर टंचाईचा फटका आता खाणावळ आणि छोट्या हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. अनेक खाणावळींना पुरेशा प्रमाणात सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने जेवण बनविणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी हॅाटेल, मेस बंद पडल्याचे चित्र पाहिला मिळत आहेत. त्याचा थेट परिणाम उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि विविध अभ्यासक्रमांसाठी बाहेरगावाहून पुण्यात येऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे.
पुणे हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधून तसेच देशभरातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. त्यापैकी अनेक विद्यार्थी कमी उत्पन्न गटातील असून ते खाणावळी किंवा स्वस्त जेवणाच्या पर्यायांवर अवलंबून असतात. मात्र सध्या निर्माण झालेल्या सिलेंडर टंचाईमुळे खाणावळी बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जात आहे.अशा परिस्थितीत शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या माध्यमातून राबवला जाणारा शंकर बाबांची माधुकरी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे.
advertisement
गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना होत आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक खिचडी प्रसादाच्या स्वरूपात मोफत जेवण दिले जाते. या उपक्रमाचे पहिले केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सुरू करण्यात आले. त्यानंतर दुसरे केंद्र भाऊसाहेब रंगारी गणपती येथे तर तिसरे केंद्र पुणे महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजी महाराज शाळा, नवी पेठ येथे सुरू करण्यात आले आहे. या तीन केंद्रांवर दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जेवणाचा लाभ घेत आहेत.
advertisement
शंकर महाराज समाधी ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वायकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील केंद्रावर दररोज सुमारे तीन ते सव्वा तीन हजार विद्यार्थी जेवण घेतात. भाऊसाहेब रंगारी गणपती येथे सुमारे 550 विद्यार्थी तर नवी पेठ येथील केंद्रावर सुमारे एक हजार विद्यार्थी जेवणाचा लाभ घेत आहेत. एकूण मिळून दररोज सुमारे पाच ते साडेपाच हजार विद्यार्थी या खिचडी प्रसादाचा लाभ घेत आहेत.
advertisement
गरजू म्हणजे केवळ गरीबच असतो असे नाही. अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांच्याकडे मर्यादित आर्थिक साधने असतात. त्यामुळे त्यांना सन्मानपूर्वक मदत मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे, असे वायकर यांनी सांगितले.
या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरावा लागतो. त्यासाठी आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, संबंधित अभ्यासक्रमाची माहिती आणि डिक्लेरेशन आवश्यक असते. त्यानंतर विद्यार्थ्यांना ओळखपत्र दिले जाते. ज्या केंद्रावर विद्यार्थ्याने नोंदणी केली आहे, त्याच केंद्रावर त्याला जेवण दिले जाते. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र व्हॉट्सअॅप गट तयार करण्यात आला असून विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते गटातून बाहेर पडतात.
advertisement
सिलेंडर टंचाईमुळे खाणावळींच्या अडचणी वाढत असताना विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम मोठा दिलासा ठरत आहे. ट्रस्टच्या वतीने कोणत्याही परिस्थितीत या जेवण सेवेत खंड पडू दिला जाणार नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील हजारो विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न काही प्रमाणात तरी सुटताना दिसत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 13, 2026 9:16 PM IST






