काही गुंडांनी सरपंचाची गाडी आडवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हल्लेखोरांनी अंडी आणि दगड मारून सरपंचाच्या गाडीच्या काचा फोडल्या. यानंतर त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून सरपंचासह गाडी जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या हल्लात सरपंचासह आणखी एकजण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेचा तपास सुरू आहे.
advertisement
नामदेव निकम असं हल्ला झालेल्या सरपंचाचं नाव आहे. ते तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी सरंपच नामदेव निकम हे बारुळ गावातून मेसाई जवळगा गावाकडे कारने जात होते. यावेळी गुंडांनी त्यांच्या गाडीवर अंडी आणि दगड मारून त्यांचा रस्ता अडवला. रस्ता अडवून त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. तसेच त्यांनी गाडीवर पेट्रोल टाकून गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.
पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत, घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याप्रकरण ताजं असताना, आता धाराशीवमध्ये देखील सरपंचावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर उपचार सुरू आहेत. घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.