धाराशिवच्या महाकाली कला केंद्रावर झालेल्या राड्यात फक्त हाणामारीच झाली नाही. तर गोळीबार झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. मात्र कलाकेंद्रात गोळीबार झाला नसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे कलाकेंद्रात नेमकं काय घडलं? दोघांना मारहाण कशामुळे झाली? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, महाकाली कलाकेंद्रात झालेली मारहाण ही जुन्या भांडणाच्या कारणातून झाल्याचं म्हटलं आहे. आरोपी अक्षय साळुंखे, राज पवार, विजय साळुंखे यांनी संदीप गुट्टे याला दगड, फरशी आणि लाकडाने मारहाण केली. या मारहाणीत संदीप गुट्टे गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी येरमाळा पोलिसांनी तीन आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्नाच्या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गोळीबार करणारा संशयित आरोपी अक्षय साळुंखे हा सोलापूर जिल्ह्यातून तडीपार असल्याची माहिती आहे.
advertisement
दुसरीकडे, ही घटना गोळीबारातूनच घडली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. मात्र पोलीस यावर प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. त्यामुळे घटनेमागे नेमकं गौडबंगाल काय आहे? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे. जखमी संदीप गुट्टे याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचारस सुरू आहेत. येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत आहेत. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
