ही घटना धाराशिव शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरात घडली. इथं एका शिकाऊ डॉक्टरच्या गळ्यावर कोयता ठेवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी तरुण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात हातात कोयता घेऊन दहशत माजवत होते. यावेळी एका आरोपीनं कोयत्याने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकीवर घाव घातले. त्याने पेट्रोलची टाकी फोडण्याचा प्रयत्न केला.
advertisement
याच वेळी घटनास्थळावरून २६ वर्षीय शिकाऊ डॉक्टर हिमांशु व्यास जात होते. ते मूळचे राजस्थानचे असून या रुग्णालयात इंटर्नशिप करत होते. दरम्यान, हिंमाशूला पाहून आरोपी त्याच्या दिशेनं आला. त्याने हिंमाशूच्या गळ्याला कोयता लावून 'तुला कापू का?' म्हणत धमकी दिली. यानंतर त्याने हिंमाशूची कॉलर पकडून काही वेळ धमकावत राहिला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.
आरोपीनं अशाप्रकारे हिंमाशूच्या गळ्यावर कोयता का लावला? धमकी का दिली? याची कसलीही माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आरोपी स्वप्नील राऊतसह त्याच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
