या प्रकरणी पीडित महिलेने शुक्रवारी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. सुकलाल रामभाऊ बोरसे (वय ५३, रा. विवेकानंदनगर, देवपूर) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.
गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार
पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरुवातीला आरोपी सुकलाल बोरसे याने पीडित महिलेला आर्थिक मदत केली होती. या मदतीमुळे दोघांमध्ये ओळख वाढली. याच ओळखीचा गैरफायदा घेत, १७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास बोरसे हा महिलेच्या घरी गेला. तिला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. महिलेची शुद्ध हरपताच आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला.
advertisement
सव्वा दोन वर्ष ब्लॅकमेल करत ६० लाख उकळले
आरोपीनं आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या धमक्यांच्या आधारावर त्याने पीडित महिलेकडून वेळोवेळी सुमारे ५९ लाख ९९ हजार ४०० रुपये इतकी मोठी रक्कम उकळली. तसेच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. मागील सव्वा दोन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता.
याव्यतिरिक्त, आरोपी मुख्याध्यापकाने पीडित महिलेचे सही असलेले पाच ते सहा धनादेश (चेक) देखील स्वतःकडे ठेवून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अखेरीस, आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने हिम्मत दाखवत पश्चिम देवपूर पोलीस ठाणे गाठले आणि मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याच्याविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी मुख्याध्यापकाला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करत आहेत.
