चालकाला डुलकी अन् तिघांनी गमावला जीव
10 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीनंतर सुमारे दीडच्या सुमारास सुरपान फाटा या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली. इनोव्हा चालकाला डुलकी लागल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात नवरदेव विजय जाधव, त्यांची आई प्रमिला रघुनाथ जाधव आणि चुलत बहीण प्रतिभा धनंजय पगारे यांचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
जाधव कुटुंबाच्या गाडीवर काळाची झडप
या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये कार्तिक धनंजय पगारे, वलंब धनंजय पगारे, भूषण कांतिलाल वाघ, महेंद्र जयवंत जाधव आणि भूपेश कैलास शिंदे यांचा समावेश आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. साखरपुड्याच्या आनंदातून आलेल्या जाधव कुटुंबाच्या गाडीवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व जखमींना कारमधून बाहेर काढून तत्काळ धुळे जिल्हा रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे कासारे व उमराणे परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेनंतर आमदार मंजुळा गावित यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन मृतांच्या नातेवाइकांचे सांत्वन केले. तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रीय महामार्ग क्र. 53 वर तातडीने दुरुस्तीचे आदेश द्यावे, अशी मागणी केली.
