मृत महिलेच्या नणंदेच्या तोंडून संपूर्ण घटना
"आम्ही २८ तारखेला दीनानाथ रुग्णालयात गेलो. तिथे असलेल्या डॉक्टरांना जाऊन भेटलो. त्यांनी माझ्या वहिनीच्या प्राथमिक चाचण्या केल्या. चाचण्यांनुसार रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने २० लाख भरायला लागतील, असे डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले. तुमची ऐपत नसेल तर सध्या १० लाख रुपया भरा. पैसे भरल्यावर त्यांना आम्ही सिझरसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाऊ, सध्या काही खाऊ नका, अशा सूचना त्यावेळी डॉक्टरांनी आम्हाला दिल्या".
advertisement
"आमच्याकडे सध्या एवढे पैसे नाहीयेत. सध्या तीन लाख रुपये घेऊन तुम्ही उपचार सुरू करा. बाकी पैसे आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून देऊ, अशी विनंती आम्ही रुग्णालय व्यवस्थापनाकडे केली. परंतु तुमची ऐपत नसेल तर तुम्ही थेट ससून हॉस्पिटलला जा, तिथेही चांगले उपचार केले जातात, असे तेथील एक डॉक्टर गर्भवतीसमोरच आम्हाला बोलले".
"डॉक्टरांचे बोलणे ऐकून माझी वहिनी खूप रडायला लागली. त्यावेळी तिचा बीपी १४० होता. त्यानंतर तिने खूप धसका घेतला. दरम्यानच्या काळात ब्लिडिंग देखील खूप वाढली होती. त्यांनी आम्हाला तेथून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले होते. तीन लाख रुपये घेऊन आम्ही बिलिंग काऊंन्टरवर उभे होते. परंतु संपूर्ण पैसे आल्याशिवाय उपचार करायचे नाहीत, अशा सूचना असल्याचे तेथे काम पाहणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले", असे मृत महिलेची नणंद प्रियांका पाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
माझ्या वहिनीला खूप ब्लिडिंग होती होती, परंतु अशावेळीही डॉक्टरांनी लक्ष दिले नाही. किंबहुना त्यांनी एक गोळीही लिहून दिली नाही. आधीच्या रुग्णालयाने दिलेली गोळी खा, असे त्यांनी आम्हाला सांगितले, असे प्रियांका पाटे म्हणाल्या.
आमची बदनामी सुरू, चौकशी सुरू केलीये, सरकारला अहवाल सादर करू- रुग्णालयाची भूमिका
दुसरीकडे रुग्णालय प्रशासनाने यावर भूमिका स्पष्ट करताना एकांगी पद्धतीने ही घटना सांगितली जात असल्याचे म्हणत रुग्णालयाची बदनामी सुरू आहे, अशी खंत व्यक्त केली. या संपूर्ण घटनेप्रकरणी अंतर्गत चौकशी सुरू असून रुग्णालय यासंबंधी राज्य सरकारला अहवाल सादर करेल, असेही रुग्णालय प्रशासनाने सांगितले आहे.
