छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक पार पडली. पण, ही निवडणूक गाजली ती प्रभाग क्रमांक २४ मध्ये झालेल्या वादामुळे. वंचित बहुजन आघाडीने भाजपचे आमदार नारायण कुचे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपचे आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये कुचे यांनी पैसै वाटण्याबद्दल संवाद केला होता. कुचे यांनी ही क्लिप नाकारली आहे पण वंचित आघाडीच्या कार्यकर्त्याने मात्र, माझं बोलणं झालं होतं ही क्लीप सत्य आहे, असा दावा केला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी प्रभाग क्रमांक २४ मधून भाजपचे बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांची बहिण गंगाबाई भिमराव भवरे रिंगणात होत्या. या ठिकाणी आधी वंचित आघाडीचं पॅनल विजयी झालं होतं. पण, फेरमतदान करण्यात आलं आणि त्यामुळे भवरे यांच्यासह भाजपचं पॅनल विजयी झालं. नारायण कुचे यांनी मतदान केंद्रावर सेटिंग केली असा आरोप वंचित आघाडीचे उमेदवार सतिश गायकवाड यांनी केला होता. या प्रकरणी आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता आमदार नारायण कुचे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. न्यूज१८ मराठीने या ऑडिओ क्लिपची पुष्टी केली नाही. पण, दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
आमदार नारायण कुचे आणि एका व्यक्तीचा फोनवरील संवाद व्हायरल
- कार्यकर्ता - कुचे साहेब, हॅलो हॅलो
- आमदार नारायण कुचे - बोल बोल, बोल ना
- कार्यकर्ता - थोडासा अंधार पडू द्या ना
- आमदार नारायण कुचे - अंधारात कुठे पैसे वाटत असतात, गोरगरीब लोकांना नोटा दिसल्या पाहिजे
- कार्यकर्ता - अहो कुठे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या, सगळीकडे चर्चा सुरू आहे म्हणून म्हणू लागलो तुम्हाला, की थोडासा अंधार पडू द्या
- आमदार नारायण कुचे - अंधारात खेळ नाही जमत, उजेडात होऊन जाऊ दे.
- कार्यकर्ता व आमदार दोघेही हसताना
- आमदार नारायण कुचे- तुम्ही अलीकडून अडवलं, आमचं पलीकडून चालू आहे
- कार्यकर्ता - नाही अडवलं नाही तुम्हाला कोणी, हा तर तुमचा गैरसमज आहे.
- आमदार - दोन दिवस तुम्हाला मी काही म्हणणार नाही, तुम्ही काय केलं मला माहित आहे.
- कार्यकर्ता - साहेब, शिव्या दिल्या नाही मी, त्यांना बाजूला केलं पोरांना त्यांचा काही संबंध नाही, ते बॉडीगार्ड आहेत. त्यांना काही बोलू नका, त्याची ड्युटी आहे ती ड्युटी करू लागले मी त्यांना बाजूला केलं.
- आमदार - आता मी एक PI ची गाडी मागितली, सात-आठ पोलीस, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो आता,
- कार्यकर्ता - बिनधास्त वाटा, कुचे साहेब, पण मी काय म्हणतो, थोडासा अंधार पडू द्या.
- आमदार - गोरगरीब जनतेचे भलं होऊ द्या ना
- कार्यकर्ता - अहो आमदार साहेब, आतापर्यंत तुम्ही भलचं करत आलो आहेत ना,
- आमदार - चलन वाटतो मी
- कार्यकर्ता - तिथे आम्ही नाही मात्र थोडासा अंधार पडू द्या, दिवसाढवळ्या एवढे चालू झालं म्हटल्यावर आमदार म्हणून दिवसाढवळ्या एवढं करत असेल तर थोडसं वाटतं
- आमदार - ठीक आहे ठेव ठेव
आमदार नारायण कुचे यांचं ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण
दरम्यान, "मी अजिबात असं कधी बोललेलो नाही. मोडतोड करून ही ऑडिओ क्लिप तयार करण्यात आलेली आहे. ऑडिओ क्लीपचा माझा काहीही संबंध नाही. विरोधी पक्षाला पराभव जिव्हारी लागल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावाचा कुचे यांनी केला.
तसंच, "आठही फेऱ्यांमध्ये आम्ही पुढे होतो, त्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला लोकांनी विश्वास आणि विकासाच्या भरवशावर निवडून दिले त्यामुळे यांच्या पराभव जिव्हारी लागला. वंचितचा काहीही संबंध नसताना त्यांनी पहिल्या दिवशीपासूनच आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी माझ्यावर आरोप केले एक कोटी दिल्याचा, पुन्हा म्हणाले evm मशीन मध्ये घोटाळा केला. आम्ही घोटाळे केले असते तर एमआयएम कशाला निवडून आले असते? असा सवाल कुचेंनी उपस्थितीत केलाा.
तसंच, "नारायण कुचेला आणि भाजपाला कसं बदनाम करायचंय यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. या ऑडिओ क्लिपला मी बिनबुडाचे आरोप मानतो, ऑडिओ क्लिप संदर्भात तक्रार दाखल केलेले आहे आणि या ऑडिओ क्लिप संदर्भात देखील तक्रार दाखल करणार आहे, या ऑडिओ क्लिपची तक्रार मी करणार आहे. अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार असून कोर्टात जाईल, असंही आमदार नारायण कुचे यांनी सांगितलं
ही रेकॉर्डिंग सत्यच, कुचेसोबत बोलणाऱ्या कार्यकर्त्याचं स्पष्टीकरण
भाजपाचे आमदार नारायण कुचे यांची एक ऑडिओ क्लिप वंचित बहुजन आघाडीचे अजय म्हस्के यांनी व्हायरल केली होती. "ही ऑडिओ क्लिप माझी नसून ती बनवण्यात आली असल्याचं दावा आमदार नारायण कुचे यांनी केला होता. पण, 'ही ऑडिओ क्लिप आमदार नारायण कुचे यांचीच आहे, आमचे संबंध चांगले असल्याने मी त्यांना फोन केला होता. भर दिवसा पैसे वाटप करू नका, मात्र त्यांनी उलट उत्तर दिली. पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पैसे वाटतो, असंही ते म्हणाले होते. जर, संशय असेल तर, "माझा सीडी आर तपासावा, मी सतत नारायण कुचे यांच्यासोबत बोलत असतो. त्यांच्याच नंबरवर मी बोललो आहे, ही रेकॉर्डिंग सत्य आहे. असं व्हायरल रेकॉर्डिंगमध्ये बोलणाऱ्या कार्यकर्ता अजय म्हस्के याने सांगितलं आहे.
