नेमकं प्रकरण काय होतं?
बुधवारी मुंबईतील कोकण भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ६५ नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी प्रक्रिया पार पडली. या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान, मुंबईच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून 'मशाल' चिन्हावर निवडून आलेल्या डॉ. सरिता म्हस्के गैरहजर होत्या. त्या अचानक गायब झाल्याने आणि त्यांचा फोन लागत नसल्याने पक्षात मोठी खळबळ उडाली होती.
advertisement
पक्षाच्या नेत्यांकडून त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता, मात्र त्या प्रतिसाद देत नव्हत्या. याच काळात त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. गट नोंदणीच्या वेळी महत्त्वाच्या नगरसेविकेचे गैरहजर राहणे ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरला होता.
मध्यरात्री घडल्या वेगवान हालचाली
दिवसभर सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींनंतर मध्यरात्री या प्रकरणाला मोठी कलाटणी मिळाली. डॉ. सरिता म्हस्के या मध्यरात्री शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या. त्यांच्या या भेटीमुळे त्या पुन्हा पक्षात सक्रिय झाल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या संपर्कात त्या होत्या. लांडे यांच्याकडून त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जात होता, असंही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
स्पष्टीकरणाकडे सर्वांचे लक्ष
निवडून आल्यानंतर अचानक नॉट रिचेबल होण्यामागे आणि शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमागे नक्की काय कारण होतं? याबाबत आता स्वतः डॉ. सरिता म्हस्के काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
