शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे उद्धवसेनेला मोठा धक्का बसला असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी भाजपची ताकद वाढणार आहे.
म्हात्रे यांच्यासोबत काही माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत. काही दिवसांपूर्वी दीपेश म्हात्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट घेतल्याची माहिती बाहेर आली होती. त्या भेटीनंतर ते शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली होती. मात्र, अखेरीस म्हात्रे यांनी भाजपचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
म्हात्रे यांनी यापूर्वी ठाकरे गटाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूकही लढवली होती. रविंद्र चव्हाण यांनी त्यांचे आव्हान परतवून लावले होते. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून भाजपने त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हात्रे यांना पक्षात आणण्यासाठी सक्रिय भूमिका बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
भाजपात प्रवेश पण अट काय?
दीपेश म्हात्रे यांनी शिंदे गटात पुन्हा पक्ष प्रवेशासाठी चाचपणी केल्याची चर्चा आहे. मात्र, आता आज भाजपात प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे माजी महापौर होते. त्याशिवाय, त्यांच्या मातोश्रीदेखील नगरसेविका होत्या. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची होणार असून भाजप आणि शिंदे गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे ठाकरे गट-मनसे हे दोघे जण युतीत लढण्याची चिन्हे आहेत. अशातच दीपेश म्हात्रे यांना भाजप प्रवेशाच्या वेळी कल्याण-डोंबिवलीचे महापौर पद आणि आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याची चर्चा सध्या कल्याण-डोंबिवलीत सुरू आहे.
दीपेश म्हात्रे यांची हकालपट्टी...
भाजपमध्ये आज प्रवेश करणारे दीपेश म्हात्रे यांची शिवसेना ठाकरे गटाने जिल्हाप्रमुख पद आणि ठाकरे गटातून हकालपट्टी केली आहे. तशी माहिती ठाकरे गटाचे मुखपत्र दैनिक सामनातून जाहीर करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यावरून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
