अर्थमंत्री अजित पवार हे निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. आपल्या मंत्र्यांचा संताप पाहता अजित पवारांच्या खात्यावर लक्ष ठेवण्याची सूचना शिंदे यांनी केली होती. मात्र, अजित पवार यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्याने थेट एकनाथ शिंदे यांच्या खात्याला रडारवर आणले आहे.
advertisement
अजित पवार यांच्या खात्याने थेट एकनाथ शिंदे यांच्या खात्याची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची भूमिका मांडली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
प्रकरण काय?
शक्तिपीठ मार्गासाठी सरकारने सुमारे 20,787 कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला असून, यासाठी ‘हुडको’कडून उचलण्यात येणाऱ्या महागड्या कर्जावर दोन टक्के अधिक व्याज लागू आहे. वित्त विभागाने याला “आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य” असं स्पष्ट मत दिलं होतं. तरीदेखील सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महामंडळाच्या कामकाजावर यापूर्वीही अनेक वेळा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेल्या प्रकल्पांमुळे आर्थिक देणी झपाट्याने वाढत असल्याबद्दल नियोजन विभागाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या विभागाकडून महामंडळाच्या आर्थिक शिस्तीवर लक्ष ठेवण्याचा आणि खात्याची स्वतंत्र पडताळणी करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. रस्ते विकास महामंडळाच्या कारभारावर कॅग ताशेरे ओढले होते. त्याशिवाय, महामंडळाच्या आर्थिक व्यवस्थापनाचे स्वतंत्रपणे परीक्षण या पडताळणी करण्याची सूचना नियोजन विभागाने केली असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.
निधीच्या वाटपावरून शिवसेनेचे मंत्री यापूर्वीही नाराज असल्याची पार्श्वभूमी असताना, आता शिंदेंच्या खात्यावर थेट प्रश्न उपस्थित केल्याने अजितदादांनी शिंदे यांच्यावर पलटवार केल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
रस्ते विकास महामंडळासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात चांगली तरतूद करण्यात आली आहे. मात्र, रस्ते विकास महामंडळाने प्रकल्पांचा प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आर्थिक खर्चाची सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. हा एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या खात्याला आर्थिक शिस्तीचा सल्ला असल्याचे म्हटले जात आहे.