अशोक खरातच्या मुलीच्या लग्नपत्रिकेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. राज्यातील बड्या नेत्यांची नावे या भोंदूच्या 'खास पाहुण्यांच्या' यादीत असल्याचे उघड झाले आहे. तर, दुसरीकडे एसआयटीच्या (SIT) तपासात खरातच्या मोबाईलमधील 'क्लोन डेटा' हाती आला आहे. त्यामुळे चौकशीच्या धास्तीने अनेक व्हीआयपी मंडळींचे धाबे दणाणले आहेत.
लग्नाच्या पत्रिकेने उडवली झोप, कोणाची नावे?
advertisement
अशोक खरातची मुलगी तृप्ताबाला हिच्या लग्नाच्या पत्रिकेचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री आशिष शेलार यांची नावे आहेत. त्याशिवाय, दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि मिलिंद नार्वेकर यांसारख्या नेत्यांची नावे 'प्रमुख पाहुणे' म्हणून छापण्यात आली होती. नाशिकमध्ये झालेल्या या सोहळ्याला कोणी-कोणी हजेरी लावली याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदेंसह तीन बड्या मंत्र्यांची नावं; अशोक खरातच्या लेकीच्या लग्नपत्रिकेत कोणाकोणाची नावं?
कोडवर्डमध्ये नेत्यांची नावे आणि अर्ज दाखल करण्यासाठी'मुहूर्त'
एसआयटीने फॉरेन्सिक टीमकडून मिळवलेल्या डेटानुसार, खरातच्या संपर्कात महाराष्ट्रातील ४० ते ४५ बडे राजकीय नेते असल्याचे समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे, हे नेते निवडणुकीचा अर्ज भरण्यापासून ते महत्त्वाचे राजकीय निर्णय घेण्यापर्यंत सर्वकाही खरातला विचारूनच करत असत. खरातने या सर्व नेत्यांची नावे आपल्या मोबाईलमध्ये 'कोडवर्ड'मध्ये सेव्ह केली होती. एसआयटी आता या कोडवर्डचा उलगडा करत असून, खरात कोणाला कोणता सल्ला द्यायचा आणि त्या बदल्यात काय व्यवहार व्हायचे, याचा तपास सुरू आहे.
सीन रिक्रिएशन आणि उद्या सुनावणी
दरम्यान, कॅनडा कॉर्नर येथील अशोक खरातच्या कार्यालयात पोलिसांनी पीडित महिलांना नेऊन 'सीन रिक्रिएशन' केले. या ठिकाणी महिलांचे शोषण केले जात होते. खरातच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या संपत असून, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. एसआयटीकडे आता तांत्रिक पुरावे आणि मोबाईलमधील चॅट्स उपलब्ध असल्याने आणखी काही 'हाय-प्रोफाइल' नावे समोर येण्याची दाट शक्यता आहे.
