पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील राजकारणाला मोठा झटका देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते आणि कळवा-खारेगाव परिसरात प्रभावशाली मानले जाणारे मिलिंद पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. हे शिंदे गटासाठी मोठं बळ मानलं जात असतानाच, दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांसाठी हा एक राजकीय धक्का मानला जात आहे.
advertisement
मुक्तागिरी येथे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मिलिंद पाटील यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने आगामी महापालिका निवडणुकीत कळवा आणि खारेगाव सारख्या मतदारसंघांमध्ये शिंदे गटाची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मिलिंद पाटलांमुळे समीकरणं बदलणार....
मिलिंद पाटील हे केवळ स्थानिक पातळीवर प्रभावी नेता असून ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेतेही होते. विशेष म्हणजे, मिलिंद पाटील हे जितेंद्र आव्हाडांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात होते. विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांना कळवा विभागातून मोठं मताधिक्य मिळवून देण्यात मिलिंद पाटील यांची निर्णायक भूमिका होती. त्यामुळे त्यांचा अचानक शिंदे गटात प्रवेश करणे, हे आव्हाडांसाठी राजकीयदृष्ट्या मोठं नुकसान ठरू शकतं.
आठवडाभर आधी पवारांसोबत दिसले होते पाटील...
पक्षांतराच्या अवघ्या आठवडाभर आधी, 1 मे रोजी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. या कार्यक्रमातच मिलिंद पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल, याची कोणतीही पूर्वसूचना नव्हती. त्यामुळे हा प्रवेश अनेकांच्या आश्चर्याचा विषय ठरला आहे.
ठाणे-कळव्यातील स्थानिक राजकारणात मिलिंद पाटील यांच्या वर्चस्वामुळे शिवसेनेला महापालिका निवडणुकीत ठोस लाभ मिळू शकतो. विशेषतः कळवा, खारेगाव आणि जवळच्या प्रभागांमध्ये ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांचा कार्यकर्त्यांमधील संपर्क नेटवर्क शिवसेनेला महत्त्वाचे ठरणार आहे.
या प्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांना काहीसा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक पातळीवर नव्याने संघटन उभारणीचा सामना करावा लागू शकतो. पुढील काही दिवसांत कळवा परिसरात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे.